भाजपने ३ वेळा विश्वासघात केल्याने सावधगिरी बाळगल्याविना युती केल्यास मगोपसाठी ती राजकीय आत्महत्या ठरेल ! – सुदिन ढवळीकर, मगोप

वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राजकीय घडामोडी

पणजी, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – भाजपने आमचा ३ वेळा विश्वासघात केला आहे. भाजपशी युती करायची असल्यास आम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल अन्यथा मगोपसाठी ती राजकीय आत्महत्या ठरेल, असे मत ‘मगोप’चे नेते तथा आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. भाजपने समविचारी पक्षांशी युती करण्यास सिद्ध असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी हे मत व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘मी आणि मगोप यांनी भाजप शासनाला वर्ष १९९९ पासून भरपूर हातभार लावला आहे; मात्र भाजपने ज्या पद्धतीने आम्हाला वागणूक दिली, ती पाहिल्यास कुठलाही पक्ष हे सहन करू शकणार नाही. भाजपशी युतीविषयी मी काही बोलणार नाही, तर हा निर्णय पक्षाची कार्यकारिणी घेणार आहे. मगोप एकूण १२ मतदारसंघांमध्ये युवा व्यावसायिकांना उमेदवारी देणार आहे.

मगोपनेच भाजपशी युती तोडली ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

निवडणूकपूर्व युतीविषयीचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेणार आहेत. मगोपने वर्ष २०१९ मधील पोटनिवडणुकीत विद्यमान आमदार सुभाष शिरोडकर यांच्या विरोधात मगोपचा उमेदवार उभा करून भाजपशी युती तोडली आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.