विश्व हिंदु परिषद, बजरंग दल मातृशक्ती आणि दुर्गावाहिनी पनवेल प्रखंड यांचा उपक्रम !
तळोजा (रायगड) – येथील दत्तपाडा परिसरात विश्व हिंदु परिषद, बजरंग दल मातृशक्ती आणि दुर्गावाहिनी पनवेल प्रखंड यांच्या वतीने नुकतेच ‘शौर्य जागरण सभे’चे आयोजन करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन श्री. संजय उलवेकर यांनी केले. सभेचा प्रारंभ शंखनाद, दीपप्रज्वलन, तसेच देवतांच्या प्रतिमेचे पूजन शास्त्रोक्त पद्धतीने आणि मंत्रोपचारांच्या साहाय्याने करण्यात आला. वक्त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
वक्त्यांचे मार्गदर्शन !
महिलांनो, वेळप्रसंगी दुर्गेचे रूप घ्या ! – सौ. प्रतिभाताई बोथरा, मातृशक्ती संयोजिका, कोकण प्रांत
धर्मशिक्षणाच्या अभावी सध्या मुली आणि महिला अधर्माकडे वळत आहेत. त्यामुळे वेळीच संस्कार होणे आवश्यक आहे. बालसंस्कार आणि महिलांसाठी सत्संग यांचे आयोजन करावे, तसेच एकत्रितपणे येऊन संघटित होऊन वेळप्रसंगी दुर्गेचे रूप घ्यावे. यासाठी मुली आणि महिला यांनी आठवड्यातील २ घंटे वेळ द्यावा !
हिंदूंनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे धर्मरक्षण करा ! – उमेश चव्हाण, कर्जत (व्याख्याते)
जात, पात, पंथ, पक्ष सोडून ‘हिंदु’ म्हणून एकत्र यावे. परकियांनी आपले वेद आणि संस्कृती नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. नालंदा विद्यापिठावर आक्रमण केले. धर्मशास्त्रांचा अभ्यास करू दिला नाही. त्याही स्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी शौर्य जागरण करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपणही धर्माचे रक्षण केले पाहिजे. त्यासाठी एकत्र येणे ही काळाची आवश्यकता आहे.
हिंदूंनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक ! – संदीप भगत, कोकण प्रांत संयोजक, बजरंग दल
आज समाजात अन्य धर्मियांची संख्या वाढत आहे. त्याच्याच जोडीला लव्ह जिहाद, धर्मांतर , गोहत्या यांचेही प्रमाण वाढत आहे. हिंदू जागृत आणि संघटित नसल्यानेच असे होत आहे. सर्वांनी हिंदु म्हणून एकत्र येऊन कार्य करूया !
क्षणचित्रे
१. कु. प्रतीक्षा गुरुनाथ मुंबईकर यांनी दुर्गावाहिनीचे शौर्यगीत म्हटले. सभेची सांगता स्तोत्राने करण्यात आली.
२. वक्त्यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी ‘जय श्रीराम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.
३. येथे आलेल्या धर्मप्रेमींना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट म्हणून देण्यात आले.