फोंडा येथील कामत रेसिडन्सीमध्ये रहाणार्‍या दोन बहिणींची हत्या

फोंडा, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – फोंडा येथील सारस्वत बँकेच्या मागे असलेल्या कामत रेसिडन्सी अपार्टमेंट या इमारतीमध्ये रहाणार्‍या दोन बहिणींची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली असून धारदार शस्त्राने त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जीवन कामत (वय ६८ वर्षे) आणि मंगला कामत (वय ७६ वर्षे) अशी त्यांची नावे असून यांपैकी जीवन कामत या गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून परिचारिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. मंगला यांच्या पतीचे निधन झाल्यावर या दोघी बहिणी गेली २० वर्षे एकत्र रहात होत्या. मंगला यांचा एक मुलगा प्रीतेश कामत याच इमारतीत दुसर्‍या मजल्यावर रहातो. प्रीतेश सकाळी आईला दूध देण्यासाठी गेला असता दरवाजा वाजवल्यावर त्याला आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्याला दाराजवळ रक्त जमा झालेले दिसल्यावर त्याने इतरांना माहिती दिली आणि पोलिसांना कळवले. दरवाजा तोडल्यानंतर स्वयंपाक घरात दोन्ही बहिणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. या दोघींच्या हत्येविषयी नेमके कारण अद्याप समजलेले नाही. यासंबंधी पोलीस अन्वेषण चालू आहे.