पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी पतीला पोलीस कोठडी

धर्मशिक्षणाअभावी खालावलेली समाजाची स्थिती ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

मालवण – तालुक्यातील गोळवण येथील सौ. जयश्री बाळकृष्ण खरात (वय २७ वर्षे) यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी पती बाळकृष्ण बमु खरात (वय ५३ वर्षे) यांना पोलिसांनी १३ ऑक्टोबरला अटक केली होती. पोलिसांनी खरात यांना १४ ऑक्टोबरला न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना १८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली.

कै. (सौ.) जयश्री खरात यांचा मृतदेह १२ ऑक्टोबरला गोळवण येथील रहत्या घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळला होता. याविषयी पोलिसांनी प्राथमिक अंदाजानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती; मात्र प्रकरणाचे अन्वेषण करत असतांना कै. (सौ.) जयश्री यांच्या भ्रमणभाषच्या ‘कव्हर’मध्ये सापडलेल्या चिठ्ठीत ‘मूलबाळ होत नसल्याने पती शारीरिक आणि मानसिक छळ करतो. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे’, असे लिहिलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले, तसेच कै. जयश्री यांची बहीण सौ. संतोषी संतोष वरक (रहाणार कडावल, कुडाळ) यांनी मालवण पोलीस ठाण्यात बाळकृष्ण खरात यांच्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी खरात यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.