मडगाव, १३ ऑक्टोबर (वार्ता.) – मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयातील ‘मेडिसीन’ विभागातील रुग्णांना आता दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हालवण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग न होता सर्व काही सुरळीत चालले, तर हॉस्पिसियो रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागही दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हालवण्यात येईल. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, अशी आशा हॉस्पिसियोमधील डॉक्टरांना आहे.
याविषयी हॉस्पिसियो रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. दीपा कोरीया म्हणाल्या, ‘‘आजपासून रुग्णांना दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हालवण्यास प्रारंभ होईल. रुग्णांना सकाळचा अल्पाहार आणि औषधे दिल्यानंतर हालवण्यात येईल. रुग्णांसमवेत आवश्यक साधन सुविधाही जिल्हा रुग्णालयात नेण्यात येईल.’’ आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. इरा आल्मेदा म्हणाल्या, ‘‘हॉस्पिसियो रुग्णालयात कार्यरत असलेले कक्ष टप्प्याटप्प्याने जिल्हा रुग्णालयात हालवण्यात येतील. राज्यात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण अल्प होत असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे.’’
जिल्हा रुग्णालय चालू झाल्यापासून आता तिसर्यांदा हॉस्पिसियो रुग्णालयातील विभाग जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येणार आहेत. यापूर्वी २ वेळा हॉस्पिसियो रुग्णालयातील काही विभाग जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले होते; परंतु कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या वेळी पुन्हा हे विभाग हॉस्पिसियोमध्ये आणण्यात आले. याविषयी डॉक्टरांचे म्हणणे आहे की, आम्हाला २ वेळा हॉस्पिसियो रुग्णालयातून परत यावे लागले. भविष्यात अशी स्थिती ओढवणार नाही, अशी आम्हाला आशा आहे. आता जिल्हा रुग्णालयातील पहिल्या २ मजल्यांवर पुरुष आणि महिला यांच्या उपचारांसाठी कक्ष असतील आणि तिसरा मजला हा कोरोनाच्या रुग्णांसाठी असेल.