मंदिर समितीच्या सदस्याकडून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या गाभार्‍यात पुस्तकाचे प्रकाशन !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १३ ऑक्टोबर – येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये मंदिर समितीचे सदस्य अतुल शास्त्री-भगरे यांनी मंदिर समितीच्या नियमांचे उल्लंघन करत श्री विठ्ठलाच्या गाभार्‍यात पुस्तक प्रकाशन केले आहे. या प्रकारानंतर ‘वारकरी पाईक संघ’ आणि ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती’ यांनी अतुल शास्त्री-भगरे यांच्यासह मंदिर समितीच्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. (मंदिर समितीच्या सदस्यांनीच मंदिराविषयीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास सर्वसामान्य जनतेने कुणाचा आदर्श घ्यायचा ? मंदिर सरकारीकरणामुळे समितीच्या सदस्यांना हे अभय मिळते का ? असे सामान्य जनतेला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)

या प्रकरणी ‘मंदिर संरक्षण कृती समिती’ने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला दिलेल्या पत्रामध्ये ‘सी.सी.टी.व्ही.’चे चित्रीकरण देण्याची मागणी केली असून ‘मंदिर समितीच्या सदस्यांना कोरोनाच्या संसर्गाच्या काळातील नियमांचे पालन करता येत नसेल, तर सर्वसामान्य जनतेला नियम मोडल्यानंतर जी शिक्षा असते, तीच शिक्षा समितीच्या सदस्यांनाही करण्यात यावी’, अशी मागणी केली आहे. हिंदू महासभेच्या वतीनेही या प्रकरणी शहर पोलीस ठाणे येथे मंदिर समितीच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात येणार आहे.