नागपूर – विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन २ वर्षांनंतर ७ डिसेंबरपासून नागपूर येथे होणार आहे. मान्सून अधिवेशनात याची घोषणा करण्यात आली होती. सध्याची परिस्थिती पहाता अधिवेशन नागपूर येथे होईल, अशी चर्चा आहे; परंतु या संदर्भातील सिद्धता पहाता अधिवेशन होईल कि नाही ?, अशी शंकाही निर्माण केली जात आहे.
करारानुसार वर्षातील एक अधिवेशन नागपूर येथे होणे बंधनकारक आहे. विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत हे १८ ऑक्टोबर या दिवशी येथे येत आहेत. ते अधिवेशनाच्या सिद्धतेचा आढावा घेतील. त्यानंतर भागवत अहवाल राज्यशासनाला सादर करतील. त्यानंतर हिवाळी अधिवेशन येथे होणार कि नाही, हे निश्चित केले जाईल. येथे अधिवेशन घ्यायचे असेल, तर शासनाकडून त्वरित निधी उपलब्ध करावा लागेल, तसेच सिद्धतेच्या कामाला गतीही द्यावी लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.