उजनी धरणातून कालव्याद्वारे भीमानदीत ५ सहस्र क्युसेक्स पाणी सोडले !

सोलापूर, १० ऑक्टोबर – उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. यामुळे ९ ऑक्टोबर या दिवशी रात्री ८ वाजता धरण १०८.३१ टक्के भरले. पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने पूर नियंत्रणाच्या दृष्टीने उजनी धरणातून कालव्याद्वारे भीमानदीत ५ सहस्र क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढत राहिल्यास भीमानदीच्या पात्रात सोडण्यात येणार्‍या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. पाणी सोडल्याने भीमानदी काठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची  पावसाळ्यात अत्यंत संथगतीने पाणीपातळी वाढत होती. या वर्षी गतवर्षीपेक्षा ३५ दिवस विलंबाने म्हणजे ५ ऑक्टोबर २०२१ या दिवशी हे धरण भरले. यानंतरही धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढतच गेला. अखेर धरण १०८.३१ टक्के भरल्यावर त्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. धरणात सध्या १२१.७४ टी.एम्.सी. पाणीसाठा आहे.