ललितापंचमीच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री त्र्यंबोलीदेवी भेट यात्रा पार पडली !
कोल्हापूर, १० ऑक्टोबर (वार्ता.) – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या मानकर्यांच्या उपस्थितीत ललितापंचमीच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवी आणि त्र्यंबोलीदेवी भेट यात्रा पार पडली. या भेटीसाठी टेकडीवरील त्र्यंबोलीदेवीच्या भेटीसाठी श्री महालक्ष्मीदेवीची पालखी सजवलेल्या रथातून आणण्यात आली होती. निधी श्रीकांत गुरव या कुमारिकेच्या हस्ते कामाक्ष राक्षसाचा (कोहळ्याचा) वध करण्यात आला.
श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री त्र्यंबोलीदेवी यांच्या भेटीमागील कथा
देव आणि दानव यांच्या युद्धामध्ये कामाक्ष राक्षसाने त्याच्या योगदंडाच्या बळावर सर्व देवांना शेळ्या-मेंढ्या बनवले होते. देवी त्र्यंबोलीने (टेंबलाई) तिच्या चतुराईने कामाक्षाकडील योगदंड काढून घेऊन देवांना पूर्ववत् केले. यानंतर देवीने कामाक्षासमवेत युद्ध करून त्याचा वध केला. त्या विजयाप्रीत्यर्थ श्री महालक्ष्मीदेवीने विजय सोहळा आयोजित केला; परंतु या सोहळ्याचे त्र्यंबोलीदेवीला आमंत्रण द्यायचे राहून गेले. त्यामुळे त्र्यंबोली रुसून पूर्वेकडील टेकडीवर जाऊन बसली. त्र्यंबोलीदेवीचा रूसवा काढण्यासाठी ललितापंचमीच्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवी तिला भेटायला गेली. तिचा रूसवा काढून झाल्यावर दोघींची हृदय भेट झाली. त्या पार्श्वभूमीवर हा सोहळा आयोजित केला जातो.