नागपूर – ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (सी.आय.आय.एम्.एस्.) आणि नॉटिंगहॅम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०२१ ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागांतील सांडपाण्यातून १ सहस्र २०० ते १ सहस्र ४०० नमुने गोळा करण्यात आले. त्यात ७५ ते ८० टक्के नमुन्यांत कोरोनाचे संक्रमण आढळले आहे. विशेष म्हणजे काही नमुन्यांत ‘डेल्टा’ विषाणूचा अंश आढळल्याने येथे ‘डेल्टा’ विषाणूचे संक्रमण होऊन गेले आहे, असे पुढे येत आहे.
‘सी.आय.आय.एम्.एस्.’चे प्रमुख डॉ. लोकेंद्र सिंह म्हणाले, ‘‘जिल्ह्यात छोट्या प्रमाणात सिरो सर्वेही केला गेला. त्यासाठी शहरातील लसीकरण न झालेल्या ४००, तर लसीकरण झालेल्या ६०० जणांच्या रक्ताच्या नमुन्यांचीही पडताळणी झाली. त्यात लसीकरण न झालेल्या ६९ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाच्या विरोधातील लक्षणाचे प्रतिपिंड आढळले. याचाच अर्थ अनेकांना नकळत कोरोना होऊन ते बरेही झाले. लसीकरण झालेल्यांतील ९८ टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंड आढळले आहेत.’’