पुणे, १० ऑक्टोबर – जमीन दस्त, तसेच नोंदणीत उल्लंघन करून दिशाभूल केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी सहदुय्यम निबंधक एल्.एम्. संगावार यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खरेदीखत दस्त, विकसन करारनामा या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे, तसेच भारतीय नोंदणी अधिनियमाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे, असे सहदुय्यम निबंधक संगावार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
संगमवाडी येथे चेतन निकम यांच्या भूमीच्या खोट्या नोंदी करण्यात आल्या. दस्तामध्ये त्यांची भूमी नमूद न करता ती विक्री करणार्या व्यक्तीची असल्याचे भासवण्यात आले. काही खरेदी खतातील सर्वेक्षण क्रमांक चुकीचे टाकून मूळ मालकी असलेल्या अरदेसर बमनजी सेठा यांच्या भूमीचीही चुकीची नोंद केली, असे संगावार यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.