मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु आणि प्र. कुलगुरु यांच्यासाठी खरेदी केलेल्या महागड्या गाड्यांच्या प्रकरणी चौकशी !

मुंबई, १० ऑक्टोबर (वार्ता.) – मुंबई विद्यापिठाचे कुलुगुरु प्रा. सुहास पेडणेकर आणि प्र-कुलगुरु रवींद्र कुलकर्णी यांच्यासाठी ६० लाख रुपयांहून अधिक व्यय करून खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी गाड्यांच्या प्रकरणाची शासनाकडून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा सहसंचालिका डॉ. सोनाली रोडे यांनी केली. ८ ऑक्टोबर या दिवशी विद्यापिठाच्या अधिसभेत युवासेनेचे सदस्य वैभव थोरात यांनी याविषयीचा स्थगन प्रस्ताव मांडला होता. ‘या विषयी ठोस उत्तर मिळाल्याविना स्थगन प्रस्ताव मागे घेणार नाही’, अशी भूमिका थोरात यांनी घेतली. याविषयी चौकशीची घोषणा केल्यावर थोरात यांनी स्थगन प्रस्ताव मागे घेतला. ‘या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल पुढील अधिसभेत सादर करण्यात येईल’, असे डॉ. सोनाली रोडे यांनी सांगितले.