नवरात्रीनिमित्त विशेष सदर…
‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण या देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेणार आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय ! सनातन संस्थेचे साधक गेली अनेक वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातनच्या साधकांकडून आरंभी आदिशक्तीची उपासना करवून घेतली आहे. त्याविषयी प्रतिदिन आपण जाणून घेणार आहोत. कालमाहात्म्यानुसार आपण हिंदु राष्ट्राची वाट बघत वैश्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जगज्जननी आदिशक्ति लयकारीही आहे. ‘ती हिंदु राष्ट्र कसे घडवून आणणार आहे ?’, हे आपण या नवरात्रीच्या काळात जाणून घेऊया. आपण आदिशक्तीला भावभक्तीने आळवूया आणि तिची कृपा संपादन करूया. ९ ऑक्टोबर या दिवशी श्री चंद्रघण्टादेवी आणि कुष्मांडादेवी यांची माहिती पाहिली. आज पुढील भाग देत आहोत.
आश्विन शुक्ल पक्ष पंचमी (१०.१०.२०२१)
विशेष सदराचा मागील भाग पहाण्यासाठी येथ क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/517495.html
५. आदिशक्ति देवीचे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी प्रकट होणारे ‘स्कंदमाता’रूप !
५ अ. बालरूपातील कार्तिकेयाला कडेवर घेतलेली आदिशक्ति ज्ञानदायिनी असल्यामुळे तिचे ‘स्कंदमाता’ हे ज्ञानस्वरूप असणे : देवांचे सेनापती, म्हणजे कार्तिकेय ! कार्तिकेयाचे एक नाव ‘स्कंद’ आहे. ‘स्कंदमाता’ म्हणजे कार्तिकेयाची माता. या अर्थाने देवीचे एक नाव ‘स्कंदमाता’, असे आहे. नवरात्रीच्या पंचमी तिथीला आदिशक्तीची ‘स्कंदमाता’ या रूपात पूजा करण्यात येते. या रूपात देवीच्या कडेवर भगवान कार्तिकेय बालरूपात बसला आहे. चतुर्भुज असलेली स्कंदमाता सिंहावर आरूढ आहे. या रूपात देवी ज्ञानदायिनी आहे. या रूपात स्कंदमातेने बालरूपातील कार्तिकेयाला स्वरूपाचे ज्ञान दिले; म्हणून ती ज्ञानस्वरूपिणी आहे.\
प्रार्थना
‘हे देवी स्कंदमाते, आम्ही अज्ञानी आहोत. आम्हा साधकांसाठी तू ज्ञान प्रदान करणारी ‘ज्ञानमाता’ आहेस. आमच्या श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांना प्रसन्न करण्याचे रहस्य तू आम्हाला शिकव. ‘आई जगदंबे, तू आम्हाला गुरुकृपा संपादन करण्यासाठी आम्ही कशी साधना करावी ?’, याचे ज्ञान दे. हे स्कंदमाते, हे ज्ञानांबिके, तू आम्हाला चिरंतन अध्यात्माचे ज्ञान दे, योग्य-अयोग्य यांचे ज्ञान दे, इष्ट-अनिष्टचे ज्ञान दे आणि संस्कृती-विकृतीचे ज्ञान दे ! हे ज्ञानदायिनी माते, आमच्यातील अज्ञानाचा अंधकार दूर करणार्या तुला आम्ही सर्व साधक शरण आलो आहोत.’
– श्री. विनायक शानभाग (६६ टक्के अध्यात्मिक पातळी), जयपूर, राजस्थान. (१७.९.२०२१)