रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ऋषीयागाच्या वेळी आलेल्या अनुभूती

१. ‘ऋषीयागात सहभागी होण्यासाठी सर्व देवी पृथ्वीवर आल्या आहेत’, असे जाणवणे

श्रीमती मिथिलेश कुमारी

‘९.१.२०१९ या दिवशीच्या ऋषीयागाच्या वेळी मला वाटत होते, या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी पृथ्वीवर सर्व देवी आल्या आहेत. जणू त्या म्हणत आहेत, ‘चला, पृथ्वीलोकात एवढा चैतन्यमय दिव्य यज्ञ होत आहे आणि एक अवतारी देवी संतांच्या सह यज्ञ करत आहे.’ त्याचा समस्त लोकांवरही प्रभाव पडत आहे. त्या वेळी सर्व देवी यज्ञामध्ये सहभागी झाल्या. हे पाहून माझी भावजागृती होऊ लागली. चारही दिशांना आनंदच आनंद जाणवत होता. साधकांना चैतन्य मिळू लागले. मोठ्या प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होऊ लागली.

२. यज्ञातून पिवळ्या, पांढर्‍या आणि लाल या रंगांच्या अग्नीच्या ज्वाळा निघणे, त्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दिशेने जातांना दिसणे आणि त्या वेळी वाईट शक्तींची शक्ती नष्ट होत असल्याचे जाणवणे

जेव्हा यज्ञाला आरंभ झाला, तेव्हा यज्ञातून पिवळ्या, पांढर्‍या आणि लाल या रंगांच्या अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या. त्या ज्वाळा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दिशेने जात होत्या आणि मंत्र म्हणणार्‍या पुरोहितांच्या दिशेने त्या ज्वाळांचा रंग पालटलेला दिसत होता. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या दिशेने ज्वाळा वेगाने प्रखर होऊन जात होत्या. त्या वेळी मला वाटत होते, ‘मोठ्या वाईट शक्तींची शक्ती नष्ट होत आहे आणि साधकांचे त्रास अल्प होत आहेत.’

३. पूर्णाहुतीच्या वेळी श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे विराट रूपात दर्शन होणे

पूर्णाहुती होत असतांना जेव्हा मंत्र म्हटले जात होते, त्या वेळी मला भगवान श्रीकृष्णाचे विशाल रूप दिसले. नंतर मी आणखी लक्षपूर्वक पाहू लागले. तेव्हा धनुष्य-बाण धारण केलेले भगवान श्रीराम विशाल रूपात दिसत होते. ‘देवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मागे आणि मंत्र म्हणणार्‍या पुरोहितांच्या मागे कितीतरी देवता हात जोडून एका रांगेत उभ्या आहेत’, असे दिसले.

४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहाची सावली देवी रूपात दिसणे आणि त्या पार्वती अन् सरस्वती यांच्यासारख्या दिसणे

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहाची सावली देवीच्या रूपात मुकुट घातलेली दिसत होती. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या पार्वती आणि सरस्वती यांसारख्या दिसत होत्या. (१६.१.२०१९)

– श्रीमती मिथिलेश कुमारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक