कारखान्याच्या संचालकांच्या घरांवरही आयकर विभागाचे धाडसत्र
पुणे, ७ ऑक्टोबर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आणि निकटवर्तियांच्या साखर कारखान्यांमध्ये आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. ७ ऑक्टोबर या दिवशी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये दौंड शुगर, आंबलिक शुगर, जरंडेश्वर साखर कारखाना, पुष्पदंतेश्वर शुगर या खासगी साखर कारखान्यांवर आणि संबंधित संचालकांच्या घरांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. बारामतीतील डायनॅमिक्स डेअरीवरही धाड चालू आहे.
अजित पवार यांच्या बहीण विजया पाटील यांच्या ‘मुक्ता पब्लिशिंग हाऊस’वर, तसेच त्यांच्या कोल्हापूर येथील घरावर आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आली आहे.
पोलीस यंत्रणेला कोणतीही कल्पना न देता राज्य राखीव दलाच्या पोलिसांचे साहाय्य घेऊन ही कारवाई चालू आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील ६० हून अधिक सहकारी साखर कारखान्यांना आयकर खात्याने ७ सहस्र कोटी रुपये आयकर भरण्यासाठी नोटीस पाठवली होती.
केंद्रात सत्तेवर आहेत त्यांच्या कोणत्या नेत्यांवर धाड पडली का ? – अजित पवार, उपमुख्यमंत्री
मुंबई – आयकर विभागाने कुठे धाड टाकावी ? हा त्यांचा निर्णय आहे. जे केंद्रात सत्तेवर आहेत, त्यांच्या कोणत्या नेत्यावर धाड पडली ? हे केवळ माझे नातेवाईक आहेत, म्हणून त्यांच्यावर धाडी टाकत आहेत, असे अजित पवार माध्यमांशी बोलतांना म्हणाले.