आंबेगाव तालुक्यातील पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यास जलसमाधी घेण्याची ग्रामस्थांची चेतावणी !

ग्रामस्थांना अशी चेतावणी का द्यावी लागते ? शासन स्वतःहून लक्ष का घालत नाही. स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली तरीही जनतेला मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठीची संवेदनशीलता शासनामध्ये निर्माण होत नाही, हे संतापजनक आहे.

प्रतीकात्मक छायाचित्र

पारगाव – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी गावे म्हणून ओळख असलेल्या ८ गावांतील पाणी प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, तर डिंभे धरणात जलसमाधी घेण्याची चेतावणी ग्रामस्थांनी दिली आहे. आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे आयोजित केलेल्या ‘श्री म्हाळसाकांत पाणी संघर्ष कृती समिती’च्या जनजागृती मेळाव्यात नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. महादेव मंदिरासमोर झालेल्या या मेळाव्याचा प्रारंभ बैलगाडी आणि मशालीसह प्रभात फेरी काढून झाली.

पाण्याअभावी येथील शेती ओसाड पडत आहे. गावातील महिलांना प्रतिदिन दुसर्‍यांच्या बागायती शेतावर रोजंदारीसाठी जावे लागत आहे. पाणी समस्येमुळे येथील तरुणांचे विवाह जुळण्यासही अडचण येत आहे. निवडणुका जवळ आल्यावर कायमस्वरूपी पाण्याची सोय होण्याचा मुद्दा चर्चेत येतो; मात्र अजूनही यावर उपाययोजना निघाली नाही. त्यामुळे पाणी प्रश्नावर सरकारने त्वरित निर्णायक भूमिका घ्यावी याकरिता मेळाव्याचे आयोजन केले होते.