पुरी येथील गोवर्धन पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे प्रतिपादन !
|
आगरा (उत्तरप्रदेश) – वर्तमानातील राजकीय परिस्थिती भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या बाजूने आहे. राहुल गांधी हेसुद्धा आता स्वतःला ‘हिंदू’ असल्याचे सांगू लागले आहेत. त्यांनी स्वतःला ‘जानवे घातलेला ब्राह्मण’ असल्याचे घोषित केले आहे. यामुळेच येत्या ३ वर्षांत भारत हिंदु राष्ट्र होईल, असे प्रतिपादन ओडिशातील पुरी येथील गोवर्धन पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी आगरा जिल्ह्यातील नगला बिंदू नावाच्या गावात आले असता केले. ते सध्या आगर्याच्या दौर्यावर आहेत. येथील भाजपचे नेते हरेंद्र सिंह यांच्या घरी भाविकांशी बोलतांना त्यांनी वरील प्रतिपादन केले. ‘हिंदूंनी सनातन परंपरांच्या प्रचार आणि प्रसार यांसाठी काम केले पाहिजे’, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी मांडलेली सूत्रे
१. आज विज्ञानाचे युग आहे. विज्ञान हेही सनातन धर्माची देणगी आहे. त्यामुळे विज्ञानही वेद, पुराण आदींचे महत्त्व नाकारू शकत नाही.
२. भारतामध्ये रहाणार्या सर्व नागरिकांचे पूर्वज हिंदू आहेत. त्यांचा उदरनिर्वाह सनातन धर्माने केलेला आहे. धर्मांतरित असलेल्यांना त्यांच्या भूतकाळाची आठवण करवून देऊन त्यांना पुन्हा हिंदु धर्मामध्ये घेतले पाहिजे.
३. देशामध्ये ४० टक्के जनता हिंदी भाषा बोलते. हिंदीमध्येच संस्कृतचाही समावेश आहे. वेद आणि पुराण यांच्या हिंदी भाषेतील आवृत्त्या सनातन धर्मातील सिद्धांतांना योग्यरित्या भाषांतरित करतात. यामुळे हिंदी भाषेचाही प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा !‘वर्ष २०२३ मध्ये भारतामध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले गेल्या २५ वर्षांपासून सांगत आहेत. अनेक शंकराचार्य, साधू, संत हेही याविषयी सांगत आहेत. संतांच्या संकल्पशक्तीने हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. समस्त हिंदूंनी या कार्यात यथाशक्ती सहभागी होणे, ही त्यांची साधनाच आहे. – संपादक |