विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक यंत्रणा गतीमान : मतदार सूचींच्या पुनर्निरीक्षणाचे वेळापत्रक घोषित

पणजी, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक यंत्रणा गतीमान झाली आहे. गोव्यासाठी नवीन ‘एम्-३’ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ई.व्ही.एम्.) आणण्यात आली आहेत. मतदार सूचींच्या विशेष सारांश पुनर्निरीक्षणाचे वेळापत्रकही मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी ४ ऑक्टोबर या दिवशी घोषित केले आहे. वर्ष २०२२ मध्ये जानेवारी मासाच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी ४ ऑक्टोबर या दिवशी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मगो आणि गोवा फॉरवर्ड या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यात आणण्यात आलेल्या नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची तपासणी २६ ऑक्टोबर या दिवशी राजकीय पक्षांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. या तपासणीनंतर ही यंत्रे ‘बार कोडिंग’द्वारे सीलबंद करून सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. गोव्यात एकूण २ सहस्र ३०० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि ‘व्हीव्ही पॅट’ यंत्रे (मत कुणाला दिले याची मतदाराला माहिती देणारे यंत्र) आणण्यात आली आहेत.

मतदार सूचीविषयीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

  • १ नोव्हेंबर या दिवशी मतदार सूचींचा मसुदा प्रसिद्ध करणार
  • १ ते ३० नोव्हेंबर दावे आणि आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत
  • २० ते २१ नोव्हेंबर आणि २७ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत ‘ब्लॉक लेव्हल ऑफिसर’ (बी.एल्.ओ.) यांची विशेष मोहीम
  • २० डिसेंबर या दिवशी दावे केलेले अर्ज निकालात काढण्यात येणार
  • ५ जानेवारी या दिवशी अंतिम मतदारसूची प्रसिद्ध केली जाणार