(म्हणे) ‘गोडसे केवळ ‘सुपारी किलर’ असून तो सावरकरांच्या डोक्याने चालायचा !’ – अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस

‘साम’ वृत्तवाहिनीवरील चर्चासत्र

  • नथुराम गोडसे हे स्वतःही वृत्तपत्रांतून वैचारिक लेखन करत, तसेच जर गोडसे यांना वैचारिक बाजू नव्हती, तर न्यायालयात त्यांनी सादर केलेला प्रतिवाद तत्कालीन लोकशाहीवादी काँग्रेस सरकारने जनतेसमोर खुला का केला नाही ? – संपादक
  • गोडसे यांचा एकेरी उल्लेख करून, त्यांच्याविषयी अपशब्द बोलून आणि गांधी यांनी केलेल्या चुकांचे उदात्तीकरण करून इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍यांना काय म्हणावे ? – संपादक
  • ‘गांधी यांची हत्या केल्यावर मृत्यूदंडच होणार’, हे ठाऊक असूनही हे कृत्य करण्यामागे गोडसे यांचे काय विचार होते ? हेही बघणे क्रमप्राप्त ठरत नाही काय ? गोडसे यांचे विचार जाणून न घेणे, ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी नव्हे का ? – संपादक
  • गांधीहत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सावरकरांना निर्दोष सोडले असतांनाही त्यांच्यावर गांधीहत्येचे आरोप करणे, हा खोटारडेपणा नव्हे का ? – संपादक
अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस

मुंबई – गोडसे हा शूटर असून तो ‘सुपारी किलर’ होता. त्याचे स्वतःचे असे कोणतेही तत्त्वज्ञान नव्हते. त्यामुळे धड त्याचे होते नि डोके सावरकरांचे, असे समजू शकतो. त्यामुळे गत ७ वर्षांपासून ज्यांना गोडसेप्रवृत्ती वाढवता आली नाही, ते आता हा प्रयत्न करत असून तो यशस्वी होणार नाही, अशी गरळओक काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. साम या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात ते बोलत होते. चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी २ ऑक्टोबरला, गांधींच्या १५२ व्या जयंतीच्या निमित्ताने नथुराम गोडसे यांच्यावर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यावर साम या वृत्तवाहिनीने ‘गांधी जयंतीलाच या चित्रपटाची का घोषणा व्हावी ?’ असा विषय घेऊन चर्चासत्राचे आयोजन केले होते. (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीस ‘सावरकर नायक कि खलनायक’ अशी चर्चासत्रे वृत्तवाहिन्या करतात, तेव्हा इतर वाहिन्या मूग गिळून गप्प का बसतात ? – संपादक)

लोंढे पुढे म्हणाले, ‘‘५५ कोटी पाकिस्तानला देणे वगैरे अपप्रचार गांधीविरोधात झाला, तो खोटा आहे. (गांधी पाकिस्तानला ५५ कोटी देण्यास निघाले होते, हे जगजाहीर असतांना सत्यनिष्ठ गांधींची बाजू घेणारे लोंढे स्वतः किती सत्याचा अपलाप करत आहेत ? – संपादक) वर्ष १९३४ नंतर नथुरामनेच ५ वेळा गांधीजींना मारण्याचा प्रयत्न केला जो सफल झाला नव्हता. सामान्य बहुजनांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाल्यामुळे बहुजनांना विकास साधता आला. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार होऊ शकत नव्हता; म्हणून त्यांनी तेव्हापासून हे गांधीविरुद्ध अपप्रचाराचे कुभांड रचले.’’ (बहुजनांचा विकास झाला असेल, तर त्यांना आरक्षण का दिले जात आहे ? – संपादक)

इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या हत्येमागची कारणे पुढे येऊ शकतात, तर गांधीहत्येमागच्या भूमिकेची चर्चा का नको ? – आनंद दवे, अध्यक्ष, ब्राह्मण महासंघ

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे

इंदिरा गांधी यांच्या हत्येमागे खलिस्तान चळवळ, तसेच पंजाबमधील आतंकवाद होता. राजीव गांधी यांच्या हत्येमागे श्रीलंकन तमिळ संघटनेचा आतंकवाद, शांतीसेना इत्यादी होते. याविषयी जशी जनतेला सर्व माहिती मिळाली, त्यावर क्रिया-प्रतिक्रिया आल्या, तसे गांधींची हत्या करण्यामागे गोडसे यांची काय भूमिका होती ? हे समोर येणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही कुणीही हिंदुत्वनिष्ठ हत्येचे समर्थन करत नाही; मात्र भूमिका मांडणे आणि त्यावर चर्चा होणे, यात काहीही वाद व्हायला नको, अशी भूमिका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी या चर्चासत्रात मांडली.

गोडसे यांनी ५ वेळा गांधींचा खून करण्याचा लोंढे यांनी केलेला दावा जर सत्य मानला, तर ५ वेळा काँग्रेस काय करत होती ? काँग्रेसने याविषयी काय पाऊल उचलले ? याचा खुलासा काँग्रेसकडून होणे आवश्यक आहे, असेही श्री. दवे या वेळी म्हणाले.

(म्हणे) ‘महेश मांजरेकर यांचे भारतीय चित्रपटसृष्टीत योगदान काय ?’ – जितेंद्र आव्हाड यांचा ट्वीट करून कांगावा

‘महेश मांजरेकर कोण आहेत ? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे योगदान काय ? लोकांचे लक्ष्य वेधण्यासाठी करण्यात आलेले हे नाटक आहे’, असे ट्वीट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकर यांच्या गोडसे यांच्यावरील नव्या चित्रपटाची घोषणा केल्यावरून आक्षेप नोंदवला आहे. (फेसबूकवर स्वतःच्या विरोधात ‘पोस्ट’ टाकली म्हणून स्वतःच्या बंगल्यावर नेऊन सामान्य नागरिकास अमानुष मारहाण केल्याचा आरोप असणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याविषयी न बोललेलेच बरे ! – संपादक )

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाच्या नावाचे पहिले चलचित्र ‘इन्स्टाग्राम’ या समाज माध्यमावर प्रसारित केले आहे. एका दिवसातच ३५ सहस्र लोकांनी हे चलचित्र बघितले असून ३०० हून अधिक लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत या विषयास हात घातल्याविषयी आभार व्यक्त केले आहेत. वर्ष २०२२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.