विशेष सदर !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी ज्याप्रमाणे मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक हिंदु धर्म अन् राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. निधर्मीवादी सरकारांकडून, तसेच प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून होणारा त्रास सहन करत ते निःस्वार्थ भावाने केवळ राष्ट्र-धर्मरक्षणासाठी दिवसरात्र संघर्ष करत आहेत. आज राष्ट्रविरोधी शक्ती निधर्मीवाद्यांच्या पाठिंब्याने बलवान होऊन हिंदुविरोधी, तसेच राष्ट्रविरोधी षड्यंत्रे करत असतांना आपल्या मनात ‘हिंदूंचे आणि राष्ट्राचे पुढे काय होणार ?’, अशी चिंता वाटते. त्या वेळी हिंदुत्वाच्या आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी लढणार्या या मावळ्यांच्या, शिलेदारांच्या संघर्षाची उदाहरणे वाचल्यास निश्चितच आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल. त्याचसाठी अशा शिलेदारांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणारे ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ हे सदर चालू केले आहे.
डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील श्री. दुर्गेश जयवंत परुळकर हे हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक आहेत. ते अखंडपणे हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रसार करण्याचे कार्य करत आहेत. सध्या ते सावरकर यांच्या विविध विषयांवरील व्याख्याने, राष्ट्र-धर्म यांची सद्यःस्थिती आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता अशा विविध विषयांवर अनेक ठिकाणी उद्बोधनही करत आहेत. त्यांनी केलेले कार्य आणि त्यांना कार्यासाठी मिळालेली प्रेरणा यांविषयीची माहिती येथे दिली आहे.
श्री. दुर्गेश परुळकर यांचा अल्प परिचय

१. विविध क्षेत्रांत कार्यरत
श्री. परुळकर वर्ष १९७७ पासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांनी आजवर विविध विषयांवर २,५०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत, तसेच त्यांचे अनेक लेख विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. सध्या त्यांचे साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांमध्ये विविध विषयांवर लेख प्रसिद्ध होत असतात.
२. ग्रंथसंपदा
अ. डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या समवेत लिहिलेले ४ ग्रंथ : ‘शिवरायांची युद्धनीती’, ‘पानिपतचा रणसंग्राम’, ‘गोवा मुक्तीसंग्राम’ आणि ‘ज्ञात-अज्ञात सावरकर’.
आ. स्वतंत्रपणे लिहिलेले १३ ग्रंथ : ‘सावरकरांची राजनीती’, ‘क्रांतिवेदीवरील समिधा’, ‘क्रांतिकारक बाबाराव सावरकर’, ‘सावरकरांचा मार्सेलीस पराक्रम’, ‘कश्मीर – उत्कर्ष आणि संघर्ष’, ‘तेजस्वी जीवन’, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी’, ‘धगधगत्या समिधा’, ‘१९६५ चा विजय’, ‘धर्मनिष्ठ सावरकर’, ‘भगवद्गीता पद्यानुवाद’, ‘निष्काम कर्मयोगी भीष्म’ आणि ‘योगेश्वर श्रीकृष्ण’.
३. राष्ट्रीय कार्यातील सहभाग
अ. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई’ याचे भूतपूर्व कार्यकारिणी सदस्य
आ. डोंबिवली, तसेच मुंबई येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास मंडळ’ यांचे भूतपूर्व कार्यवाह
इ. ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अनेक आंदोलनांत सहभाग
४. आध्यात्मिक विशेषता
श्री. दुर्गेश परुळकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याचे १७.६.२०२२ या दिवशी गोवा येथे झालेल्या ‘दशम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घोषित केले होते.
देहात प्राण असेपर्यंत कर्तव्य म्हणून राष्ट्र आणि धर्म अभिमान जागवण्याचा संकल्प करणारे श्री. दुर्गेश परुळकर !

१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य हाती घेण्यामागील कारण
हिंदु धर्म आणि संस्कृती ही क्षात्रतेजाने अन् ब्राह्मतेजाने नटलेली आहे. ‘श्रीराम, श्रीकृष्ण हे आपल्या देशाचे राष्ट्रपुरुषसुद्धा आहेत’, याची जाणीव क्षात्रतेजाचा विसर पडलेला हिंदु समाज विसरून गेला. त्यामुळे हिंदु समाजाची प्रतिकारशक्ती नष्ट झाल्याची जाणीव स्वातंत्र्यवीर सावरकर यांना झाली. देशात अहिंसा आणि सहिष्णुता यांचा अतिरेक झाला. परिणामी हिंदु समाज स्वतःची राजकीय दृष्टी गमावून बसला. त्यामुळे हिंदु समाजाने क्षात्रतेजाकडे पाठ फिरवली; म्हणून सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारला. ‘केवळ ब्राह्मतेज किंवा क्षात्रतेज उपयुक्त पडत नाही. या दोन्हींची सांगड घातल्यावाचून दुष्टांचा पराभव करता येत नाही’, याची जाणीव हिंदु समाजाला करून देण्यासाठी सावरकर यांनी ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ लिहिला आणि शस्त्र अन् शास्त्र यांचे महत्त्व विशद केले. दुर्दैवाने सावरकर यांच्या या विचारांकडे हिंदु समाजाने दुर्लक्ष केले. परिणामी राष्ट्राची अपरिमित हानी झाली.
‘मुसलमान समाजाला आपल्या नियंत्रणात ठेवण्याऐवजी हिंदु समाज मुसलमानांच्या ताटाखालचे मांजर होण्यास सिद्ध झाला. असे झाले, तर देशाला पुन्हा पारतंत्र्यातच जावे लागेल’, हे सावरकर यांनी जाणले; म्हणूनच ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ सावरकर यांनी हिंदु समाजाच्या हाती दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा ग्रंथ म्हणजे दुसरी भगवद्गीता आहे. रावणाचा वध करणारा श्रीराम आणि अर्जुनाचे सारथ्य करून त्याला युद्धासाठी प्रवृत्त करणारा श्रीकृष्ण या दोन महापुरुषांना हिंदु समाजाने स्वतःचे प्रेरणास्थान मानले, तर जगातील कोणतीही शक्ती हिंदु समाजाला पराभूत करू शकत नाही.
‘जोपर्यंत हिंदु समाज जातीभेदाच्या रवरवातून बाहेर येत नाही, तोपर्यंत हिंदु समाजाचे संघटन होणे अशक्य’, हे सावरकर यांनी ओळखले आणि त्यांनी अस्पृश्यता चळवळ आरंभली. हिंदु समाजाचे होणारे धर्मांतर टाळण्यासाठी सावरकर यांनी शुद्धी चळवळीचा आधार घेतला. ‘धर्मांतर झाले की, राष्ट्रांतर होते’, हा सिद्धांत सावरकर यांनी मांडला. सावरकर यांची ही विचारसरणी हिंदू समाजाला आणि हिंदु राष्ट्र निर्मितीला पोषक आहे; म्हणूनच सावरकर यांच्या विचारसरणीेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य हाती घेतले.
२. वैचारिक प्रतिवाद करून खोटेपणा उघड करणे
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारधारा मुसलमानांचे तुष्टीकरण करण्यास अनुमती देत नाही. त्यांच्या प्रखर राष्ट्रवादासमोर स्वतःची डाळ शिजणार नाही, हे जाणून काँग्रेसने सावरकरांशी वैर साधले. सावरकर यांना अवमानित आणि अपकीर्त करण्याचा कुटील डाव काँग्रेसने टाकला. ‘सावरकर यांना अपकीर्त केल्यावाचून हिंदुस्थानची जनता आपल्या पाठीशी उभी रहाणार नाही आणि त्यांचा राष्ट्रवाद स्वीकारला, तर मुसलमानांचा पाठिंबा न मिळता स्वतःचे श्रेष्ठत्वही लयास जाईल’, याची खात्री काँग्रेसला होती आणि आहे.
स्वतःचे अस्तित्व टिकवण्याच्या विकृत मनोवृत्तीमुळे काँग्रेसला राष्ट्रघातक विचारसरणीचा पुरस्कार करण्यावाचून अन्य कोणताही पर्याय सुचला नाही. सावरकरांशी वैचारिक प्रतिवाद करून त्यांचा पराभव करण्याएवढी प्रखर राष्ट्रनिष्ठा, देशाची विजयाची ऐतिहासिक परंपरा आणि प्राणाचे मोल देऊन स्वत्व टिकवण्यासाठी लागणारी प्रखर प्रतिकारनिष्ठा यांचा अभाव काँग्रेसकडे आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याशी स्पर्धा करता येत नाही; म्हणून सावरकर यांना अपकीर्त करण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे, हे लक्षात आले आणि त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्यांची विचारसरणी सातत्याने सांगत रहाणे, तेच आम्ही आमचे राष्ट्रीय कर्तव्य मानले.
३. धर्म-अध्यात्म, राष्ट्रभक्ती यांच्या प्रसाराच्या कार्यात लिखाणाच्या माध्यमातून अमूल्य योगदान !
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि आचार जाणून घ्यायचे असतील, तर त्यांनी वाचलेले ग्रंथ आपणही अभ्यासले पाहिजेत’, असे मार्गदर्शन आदरणीय ज.द. जोगळेकर यांनी आम्हाला केले. या मार्गदर्शनानुसार शक्य आणि जमेल तेवढा अभ्यासण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला गेला. सावरकर यांनी ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या ग्रंथांचे परीक्षण केले. ‘वेदामृत सर्वांना उपलब्ध झाले पाहिजे’, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. ‘सावरकर विज्ञाननिष्ठ असले, तरी त्यांची विज्ञानदृष्टी निसर्गातील चमत्कार, म्हणजे सृष्टीने विज्ञानाला घातलेले एक कोडे असून ते सोडवण्याचे आव्हान देण्यात आले’, असे मानण्याएवढी प्रखर होती.
‘आपल्याला मृत्यूचे भय वाटत नाही; कारण श्रीकृष्णाचे ओळखपत्र माझ्याकडे आहे’, असे सावरकर यांनी ‘मृत्यूशय्येवर’ या कवितेत स्पष्टपणे म्हटले आहे, तसेच त्यांनी ‘आय नो हाऊ टू एंड माय लाईफ’, असे उद्गार काढले होते. संतांप्रमाणे त्यांनाही स्वतःच्या जीवनाचा समारोप करायचा होता. ‘प्रायोपवेशन’ (अन्न, जल आणि औषधे यांचा त्याग केल्याने होणारा मृत्यू) करून सावरकरांनी संतांच्या मार्गावरून वाटचाल केलेली आढळून येते. त्यांनी अध्यात्मशास्त्राला दुर्लक्षित केले नाही, हे तेवढेच सत्य आहे. हे लक्षात घेऊनच रामायण आणि महाभारत यांचा अभ्यास आमच्याकडून केला गेला.
‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथातील ‘सद्गुण विकृती’ या प्रकरणात सावरकर यांनी श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे दाखले दिलेले आहेत. एवढेच नाही, तर सावरकर म्हणतात, ‘प्रभु रामचंद्र पहिले हिंदुसम्राट आहेत.’ सावरकर यांच्या या विचारांचा प्रभाव श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्राकडे पहाण्याची राजकीयदृष्टी देण्यास उपयुक्त ठरला.
४. समाजात राष्ट्रप्रेमाचे बीज रोवणे, हिंदूंमध्ये जागृती आणि धर्माभिमान करणारे लिखाण करणे यांसाठी मिळालेली प्रेरणा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याप्रमाणेच छत्रपती शिवराय हे उपास्यदैवत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या सवंगड्यांमध्ये, सहकार्यांमध्ये तेजस्वी राष्ट्रभक्ती जागृत केली. समर्थ रामदासस्वामी यांनी त्यांच्या कार्याला उपयुक्त ठरेल, असे विचार हिंदु समाजात खोलवर रुजवले. ‘मारिता मारिता मरेपर्यंत झुंजेन’, ही लढाऊ वृत्ती, ही प्रतिकारनिष्ठा शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या शपथेला पूरक ठरली. ‘हिंदू पदपादशाही’ या ग्रंथात सावरकर यांनी हेच सूत्र मांडले.
छत्रपती शिवरायांनी ‘हा देश माझा आहे. हे राष्ट्र माझे आहे; म्हणून या राष्ट्राचे संरक्षण आणि संवर्धन यांचे दायित्व माझ्यावरच आहे’, ही जाणीव मावळ्यांमध्ये निर्माण केली. म्हणून ‘घरातील कोणत्याही शुभकार्यापेक्षाही राष्ट्रीय कर्तव्य अधिक श्रेष्ठ आहे’, याची जाणीव सर्वसामान्य मावळ्यांच्या अंत:करणात खोलवर रुजली होती. म्हणूनच ‘आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे !’, असे सहज उद्गार सरदार तानाजी मालुसरे यांच्या मुखातून निघाले. छत्रपती संभाजी महाराज यांनी तर राष्ट्र आणि धर्म यांसाठी स्वतःचे प्राणार्पण केले. त्यांच्या देहाचे तुकडे करण्यात आले; पण त्यांची राष्ट्र आणि धर्म निष्ठा उणावली नाही. मरणाच्या भीतीने त्यांनी माघारही घेतली नाही.
प्रखर राष्ट्रभक्ती ही मृत्यूवर मात करण्याची प्रेरणा देते. सावरकर यांनी अंदमानात अनंत यातना सहन केल्या. आत्महत्या करण्याचे विचार सावरकर यांच्याही मनात आले; पण त्यांनी त्यावर विजय मिळवला. हिंदुस्थानच्या तेजस्वी इतिहासाचे हे दाखले राष्ट्रासाठी संघटित होऊन राष्ट्ररक्षणाची प्रेरणा देतात, तसेच हौतात्म्याची ओढही निर्माण करतात. ‘आत्मा अमर असून तो शस्त्राने भेदता येत नाही. पाण्याने भिजवता येत नाही. वार्याने सुकवता येत नाही आणि अग्नीने जाळता येत नाही’, ही ‘भगवद्गीते’तील शिकवण सर्व क्रांतीकारकांनी आत्मसात् केली होती. हे प्रेरणादायी विचारच धर्माभिमान जागा करण्यास उपयुक्त ठरतात. यावर दृढ विश्वास असल्याने त्याचा आधार घेऊन राष्ट्र आणि धर्म अभिमान जागवण्याचे कार्य घडू शकले.
‘सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनांत सहभाग घेण्यास याच विचारांनी प्रवृत्त केले, हे नम्रपणे सांगतांना आम्हाला अभिमान वाटतो. सावरकर म्हणतात, त्याप्रमाणे हे राष्ट्रीय कार्याचे व्रत आहे. ‘देहात प्राण असेपर्यंत कर्तव्य म्हणून’, या व्रताचे आचरण करायचे आहे.