सोलापूर येथे ‘जनहित शेतकरी संघटने’ची आंदोलनाद्वारे मागणी
सोलापूर – ‘महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटने’चे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सरकारने ऊस उत्पादक शेतकर्यांच्या देयकाविषयी घेतलेल्या निर्णयावर अप्रसन्नता व्यक्त केली. ८ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार सोलापूर दौर्यावर येणार आहेत, त्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, अशी चेतावणीही संतप्त झालेले देशमुख यांनी या वेळी दिली. प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबर या दिवशी ऊस उत्पादक शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकर्यांची वाट लावली; मात्र त्यांनी कारखानदार आणि कारखान्याचे अध्यक्ष यांच्या संदर्भात बचावात्मक भूमिका घेतली आहे. शेतकर्यांच्या खात्यावर एकरकमी देयकाचे पैसे जमा करा; अन्यथा सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांना पाय ठेवू देणार नाही.