माळशिरस (जिल्हा सोलापूर) येथील न्यायाधिशांच्या घरासमोरील चंदनाच्या झाडाची चोरी !

‘न्यायाधिशांच्याच घरासमोरील वस्तूंची चोरी होत असेल, तर सर्वसामान्य जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा’, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ?

प्रतीकात्मक छायाचित्र

सोलापूर, ३ ऑक्टोबर – माळशिरस येथील दिवाणी न्यायाधीश जी.एम्. नदाफ यांच्या निवासस्थानातील चंदनाचे झाड २९ सप्टेंबरच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याविषयी माळशिरस तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. चोरट्यांनी चंदनाच्या झाडाचा मुख्य बुंधा करवतीने कापून नेला आहे. न्यायाधीशांच्या घरी चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मागील २ वर्षांपूर्वीही माळशिरस येथील न्यायाधिशांच्या घरासमोरील चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. येथील चंदनाचे झाड चोरून नेण्याची ही दुसरी घटना आहे. वन विभागाकडे नोंद केलेल्या या चंदनाच्या झाडाची किंमत ७ सहस्र रुपये होती. या घटनेचे अधिक अन्वेषण माळशिरस पोलीस करत आहेत.