डॉ. विजय जोशी यांना ऑस्ट्रेलियन सरकारचा ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा मानाचा पुरस्कार प्रदान !

लोखंडापासून निघणार्‍या मळीचा पुनर्वापर करून टिकाऊ रस्ते बांधणीचे तंत्रज्ञान विकसित

डॉ. विजय जोशी

पुणे – लोखंडापासून निघणार्‍या मळीचा पुनर्वापर (रिसायकलिंग) करून टिकाऊ रस्ते बांधणीचे तंत्रज्ञान विकसित करणारे डॉ. विजय जोशी यांना ऑस्ट्रेलियाच्या सरकारने ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करून गौरवले आहे. भारतातील ‘पद्मश्री’ पुरस्काराच्या दर्जाचा हा पुरस्कार आहे.

डॉ. विजय जोशी हे मूळचे ठाण्याच्या मोतीलाल हरगोविंददास विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी मुंबईतील ‘व्ही.जे.टी.आय.’ अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीची (‘सिव्हिल इंजिनिअरिंग’ची) पदवी घेतली आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे त्यांनी टाटा, तसेच हमफ्रीज अँड ग्लेक्सो (आताची ‘जेकब इंजिनिअरिंग’) या उद्योग समुहांमध्ये काम केले. तळोजा येथील ‘दीपक फर्टिलायझर्स’ येथे कार्यरत असतांना २५० फूट उंच ‘प्रिलिंग टॉवर’च्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. गेल्या २० वर्षांपासून ते सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक आहेत. तेथे ‘स्टील उत्पादनात वाया जाणारे घटक रस्त्यांसाठी कसे वापरता येतील का ?’ या विषयावरचा प्रबंध पूर्ण करून त्यांनी ‘डॉक्टरेट’ ही पदवी मिळवली. ऑस्ट्रेलियातील प्रमुख रस्त्यांसह सिडनी विमानतळाच्या तिसर्‍या ‘रन-वे’साठी (विमानाची धावपट्टी) हेच तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यातून उत्तम दर्जाचे आणि टिकाऊ रस्ते बांधले गेले. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ऑस्ट्रेलियात रस्ते बांधणीतील रेती, खडी आणि अन्य सामग्री अशी मिळून एकूण २ कोटी टन एवढ्या प्रचंड नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत झाली. डॉ. जोशी यांच्या या कार्याचे ‘ब्राह्मण जागृती सेवा संघा’नेही कौतुक केले आहे.

डॉ. जोशी यांनी भारताला विनामूल्य देऊ केलेले तंत्रज्ञान भारताने नाकारले !

विद्वान आणि हुशार भारतीय संशोधक, तज्ञ हे संशोधक वृत्तीने अन् कष्ट करून संशोधन करतात; मात्र भारतात त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते विदेशाची वाट धरतात. प्रज्ञावंतांचा हा उपहास टाळण्यासाठी शासनकर्त्यांनी प्रयत्न करायला हवेत !

डॉ. जोशी यांनी लोखंडापासून निघणार्‍या मळीचा पुनर्वापर करण्याचे तंत्रज्ञान भारताला विनामूल्य देण्याची सिद्धता दाखवली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.