हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी जलसमाधी घेण्याची घोषणा करणारे महंत परमहंस दास यांची माघार

आता ७ नोव्हेंबर २०२३ पासून देहलीतील रामलीला मैदानावर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आमरण उपोषण करणार !

वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच असल्याने अशा उपोषणाची आवश्यकता भासणार नाही; मात्र हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अशा संत-महंतांनी देशभरात जागृती करून हिंदूंना संघटित केले पाहिजे ! – संपादक

तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास

अयोध्या (उत्तरप्रदेश) – १ ऑक्टोबरपर्यंत भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केले नाही, तर २ ऑक्टोबरला जलसमाधी घेईन, अशी घोषणा करणारे येथील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी आता ७ नोव्हेंबर २०२३ पासून देहलीच्या रामलीला मैदानामध्ये आमरण उपोषण प्रारंभ करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने १ ऑक्टोबरपर्यंत देशाला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित न केल्याने महंत परमहंस दास जलसमाधी घेतील का ? हे पहाण्यासाठी तपस्वी छावणीबाहेर मोठी गर्दी जमली होती. पोलिसांचाही येथे मोठा बंदोबस्त होता.

महंत परमहंस दास म्हणाले की, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कोट्यवधी हिंदूंच्या निवेदनामुळे मी जलसमाधी घेण्याचा विचार रहित केला आहे. आपण सर्व मिळून प्रयत्न करू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करू.