सोलापूरच्या चार हुतात्म्यांचे बलीदान हा देशगौरवाचा ठेवा ! – देवूसिंह चौहान, केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री

चार हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टपाल विभागाने सिद्ध केलेल्या विशेष टपाल तिकिटाचे राज्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

टपाल तिकिटाचे अनावरण कार्यक्रमास उपस्थित (फेटा घातलेले) केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान आणि अन्य मान्यवर

सोलापूर, २ ऑक्टोबर – हुतात्म्यांनी केलेल्या बलीदानाचे स्मरण करून भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात नागरिकांनी देशाप्रती असलेल्या प्रत्येक कर्तव्याचे पालन करतांना रचनात्मक उपक्रम आणि कार्यक्रम यांतून लोकशक्ती सिद्ध करावी. सोलापूरच्या चार हुतात्म्यांचे बलीदान हा देशगौरवाचा ठेवा आहे, असे मत केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी व्यक्त केले. येथील नियोजन भवन येथे सोलापूरचा स्वाभिमान असलेले मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या चार हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टपाल विभागाने सिद्ध केलेल्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण राज्यमंत्री चौहान यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यमंत्री चौहान पुढे म्हणाले की, देश स्वतंत्र करण्यासाठी सर्वस्व त्यागाची भावना या हुतात्म्यांमध्ये होती. याच भावनेने प्रत्येक नागरिकाने देशाची संसाधने जतन आणि संवर्धन करणे, इतरांना रचनात्मक सहकार्य करणे, दायित्वाच्या भावनेतून कर्तव्याचे पालन करणे या पद्धतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी झाले पाहिजे. या वेळी भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, सोलापूर महापालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सुभाष देशमुख, पोस्ट विभागाचे हरीश अग्रवाल, सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त पी. शिवशंकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.