सीमेविषयी तडजोड होत नाही, तोपर्यंत भारत आणि चीन यांच्यात संघर्ष होत राहील ! – सैन्यदलप्रमुख नरवणे

सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे

लेह (लडाख) – भारत आणि चीन यांच्यात जोपर्यंत सीमेविषयीची तडजोड होत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांत संघर्ष होत राहील, असे विधान सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी केले. ते लडाखच्या दौर्‍यावर आहेत. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

१. सैन्यदलप्रमुख नरवणे पुढे म्हणाले की, चीनसमवेत गेल्या वर्षभरापासून चर्चा चालू आहे. याद्वारे दोन्ही देशांतील वाद सोडवला जाऊ शकतो.

२. पाकविषयी बोलतांना नरवणे म्हणाले की, फेब्रुवारी ते जून या मासांमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले नाही; मात्र नुकतेच घुसखोरीच्या घटना घडल्या आहेत, तसेच गेल्या १० दिवसांत शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याच्या २ घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत भारतीय सैन्य प्रत्युत्तर देण्यास सिद्ध आहे.

३. अफगाणिस्तानविषयी ते म्हणाले की, आम्ही अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सध्या तेथील स्थितीविषयी बोलणे घाईचे ठरेल.