श्री तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सव काळात प्रतिदिन १५ सहस्र भाविकांनाच प्रवेश !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १ ऑक्टोबर – नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सर्व मंदिरे उघडण्यात येणार आहेत; मात्र शारदीय नवरात्रोत्सव काळात प्रतिदिन पहाटे ४ ते रात्री १० या वेळेत केवळ १५ सहस्र भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे, असा लेखी आदेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढला आहे. या आदेशात पुढे म्हटले आहे की, भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे; मात्र त्यांना अभिषेक किंवा अन्य विधींना अनुमती मिळणार नाही, तसेच महंत, सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत देवीचे सर्व कुलाचार विधी होणार आहेत.

१. याविषयीचा जिल्हाधिकारी यांचा आदेश माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाने घोषित केला आहे. परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यांना धाराशिव जिल्ह्यात प्रवेश करतांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी बंधनकारक नाही; मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना धाराशिव जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी ७२ घंट्यांच्या आतील आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे.

२. यात्रा काळात कोरोनाच्या नियमांचे पालन बंधनकारक असून उपाहारगृह आणि दुकाने यांमध्ये असलेले कर्मचारी यांचे २ डोस पूर्ण झालेले असून त्यांची सूची प्रशासनाला कळवण्यास सांगितले आहे.

३. नवरात्रोत्सवातील कोजागिरी पौर्णिमा यात्रा रहित करण्यात आली आहे. १८ ते २० ऑक्टोबर या काळात जिल्हाबंदी लागू करण्यात आली असून तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.

४. तुळजाभवानी मंदिरात ६५ वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजाराने पीडित व्यक्ती, गरोदर स्त्रिया आणि १० वर्षांखालील बालके, यांना प्रवेश देण्यात येणार नाही. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मंदिराच्या परिसरातील २०० मीटरपर्यंत सोललेले नारळ आणि सुट्या तेलाची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व भाविकांनी प्रशासनाकडून केलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करून साहाय्य करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक आणि तहसीलदार यांनी केले आहे.