तृणमूल काँग्रेसच्या गोवा प्रवेशामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्या मतांची संख्या घटेल ! – सुदिन ढवळीकर, आमदार, मगो

वर्ष २०२२ मधील गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राजकीय घडामोडी !

डावीकडून श्री. सुदिन ढवळीकर आणि श्री. शैलेंद्र वेलिंगकर

फोंडा, १ ऑक्टोबर (वार्ता.) – तृणमूल काँग्रेसच्या गोवा प्रवेशामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्या मतांची संख्या घटणार आहे. काँग्रेस आणि भाजप यांनी सत्तेच्या लोभापोटी गोव्यात फूट पाडण्याचे राजकारण चालू केले होते अन् आता भाजप आणि काँग्रेस यांचेच अनुकरण तृणमूल काँग्रेस करत आहे, असा आरोप मगोचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी केला.

ते पुढे म्हणाले, ‘‘लुईझिन फालेरो यांनी वयाच्या सत्तरीत (वय ७० वर्षे उलटल्यावर) म्हणजेच राजकारणातून निवृत्त होण्याच्या वेळी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या वयात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून फालेरो गोमंतकियांना काय न्याय देणार ? आगामी निवडणुकीत नवीन पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचा वापर करतील. गोव्यातील मतदारांनी खालच्या पातळीच्या राजकारणाला बळी पडू नये. प्रत्येक मतदाराचे दायित्व आहे की, त्याने गोव्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केलेल्या पक्षालाच सत्तेवर आणावे. वर्ष २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सत्तेत परिवर्तन घडवून आणणे मतदारांच्या हातात आहे. एका पक्षातून दुसर्‍या पक्षात उडी मारणारे आमदार आणि त्यांना प्रोत्साहन देणारे यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. भाजपने २ वेळा मगोपचा विश्वासघात केला आणि म्हणून मगोप भाजपशी युती करण्याच्या बाजूने नाही. निवडणुकीत युती करण्याचा निर्णय मगोपची केंद्रीय समिती घेईल.’’

शैलेंद्र वेलिंगकर यांनी घेतली मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांची भेट

फोंडा – परशुराम सेनेचे श्री. शैलेश वेलिंगकर यांनी मगोपचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गोव्यातील राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.