पणजी, ३० सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यात कृषी आणि फलोत्पादन महाविद्यालय स्थापन करण्यास केंद्रशासन इच्छुक आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली. केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी ३० सप्टेंबर या दिवशी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या गोवा संकुलाला भेट दिली आणि तेथील संचालक, अधिकारीवर्ग अन् शेतकरी यांच्यासमवेत आढावा बैठक घेतली. या वेळी कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी ही माहिती दिली. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘गोव्याला कृषी आणि फलोत्पादन महाविद्यालयाची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र गोवा शासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.’’ कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी या वेळी आधुनिक पद्धतीने कृषी उत्पादन करणार्या दर्शना पेडणेकर यांचे कौतुक केले.