नागपूर येथील मुद्रांक विक्रेत्यांकडून १०० रुपये मुद्रांकांची ५०० रुपयांना विक्री करून नागरिकांची लुबाडणूक ! 

कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार; देखरेख करणारी यंत्रणाच नाही !

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच मुद्रांक विक्रेते नागरिकांची अशी लुबाडणूक करत असतांना जिल्हा प्रशासन झोपले आहे का ? त्यांना या गोष्टी ठाऊक असतांनाही ते मुद्रांक विक्रेत्यांवर कठोर कारवाई का करत नाहीत ? जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी या प्रकरणात लक्ष घालून मुद्रांक विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून मुद्रांकांची विक्री योग्य प्रकारे चालू ठेवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. – संपादक

जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर

नागपूर – ‘प्रतिवर्षी शाळा आणि महाविद्यालये येथील प्रवेश प्रक्रिया चालू झाल्यावर होणारा मुद्रांकाचा तुटवडा यंदाही निर्माण झाला असून या संधीचा लाभ घेत मुद्रांक विक्रेते अधिक दराने त्याची विक्री करत आहेत’, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. १०० रुपयांचा मुद्रांक ४००-५०० रुपयांना विकून नागरिकांची लुबाडणूक केली जात आहे.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील तहसील कार्यालयातच मुद्रांक विक्री केली जाते. त्यासाठी विक्रेत्यांना परवाने देण्यात आले असून कोषागार कार्यालयाकडून त्यांना मुद्रांक पुरवठा केला जातो. तो करतांना कोणाला किती मुद्रांक दिले जाते ?, याची नोंद केली जाते; मात्र विक्रेते ते निर्धारित दराने विकतात कि कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार करतात, यावर देखरेख करणारी यंत्रणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नाही. त्यामुळे विक्रेत्यांचे फावले आहे.

मुद्रांक विक्रेते केवळ सकाळी १ घंटाच मुद्रांकांची विक्री करतात. काही विक्रेते मोजके मुद्रांक विक्री करून इतर मुद्रांक साठवून ठेवतात आणि त्यांच्या ठरलेल्या ग्राहकांना अधिक दराने विकतात. याही परिस्थितीत काही मुद्रांक विक्रेते प्रामाणिकपणे त्यांना मिळालेल्या सर्व मुद्रांकांची विक्री निर्धारित दराने करतात. काही विक्रेते आधारकार्ड पाहून त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांना एक किंवा दोनच मुद्रांक देतात; मात्र असे विक्रेते बोटावर मोजण्याइतकेच आहेत. (प्रामाणिक मुद्रांक विक्रेत्यांनाच शासनाने विक्रीची अनुमती देऊन इतरांचे परवाने निलंबित भ्रष्टाचार्‍यांवर जरब बसेल ! – संपादक)