दिवसा पथदीप (स्ट्रीट लाईट) चालू राहिल्याने होणारा विजेचा अपव्यय रोखण्यासाठी उपाययोजना काढा !

‘सुराज्य अभियान’च्या वतीने गोव्याचे ऊर्जामंत्री, दक्षिण गोव्यातील विद्युत् विभागाचे अधीक्षक अभियंता आणि फोंडा येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

असे प्रशासनाला का सांगावे लागते ? ते स्वतःहून यावर कारवाई का करत नाही ? – संपादक

डावीकडून श्री. दत्तात्रेय कोलवेकर, श्री. शिवदत्त नाडकर्णी,  श्री. सत्यविजय नाईक आणि निवेदन स्वीकारतांना विद्युत् विभागाचे कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत

पणजी – दिवसा पथदीप चालू राहिल्याने होणारा विजेचा अपव्यय टाळण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना काढावी, अशी मागणी ‘सुराज्य अभियान’च्या वतीने मडगाव येथील दक्षिण गोवा (मंडळ – १) विद्युत् विभागातील अधीक्षक अभियंता राजीव सामंत आणि फोंडा येथील विद्युत् विभागातील कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत यांच्याकडे ३० सप्टेंबर या दिवशी एका निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनाची एक प्रत ऊर्जामंत्री नीलेश काब्राल यांनाही देण्यात आली आहे. ‘वीज’ ही राष्ट्रीय संपत्ती असून तिचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. त्यामुळे विजेचा अपव्यय टाळण्यासाठी विद्युत् विभागाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. ‘सुराज्य अभियान’च्या वतीने श्री. सत्यविजय नाईक, श्री. शिवदत्त नाडकर्णी, श्री. दत्तात्रेय कोलवेकर आणि श्री. विराज निकम यांनी हे निवेदन दिले. ‘सुराज्य अभियान’ हा हिंदु जनजागृती समितीचा सामाजिक उपक्रम आहे.

दक्षिण गोव्यातील फोंडा येथे काही ठिकाणी दिवसभर पथदीप चालू असल्याचे नेहमीच आढळून येते. डिचोली, रायबंदर आदी ठिकाणचे पथदीप सकाळी ८.३० वाजेपर्यंत किंवा त्याहून अधिक वेळ चालू असतात. गोव्यात वीजनिर्मिती होत नसल्याने वीज इतर राज्यांतून आयात करावी लागते. यासाठी गोवाशासनाला पुष्कळ व्यय (खर्च) करावा लागतो. ‘विजेचा अपव्यय टाळणे’ म्हणजे एकप्रकारे वीजनिर्मिती केल्यासाखेच आहे. त्यामुळे या विजेचा योग्य वापर होण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवणे, हे गोवा राज्य विद्युत् महामंडळाचे दायित्त्व आहे. तरीही प्रशासनाच्या दायित्त्वशून्यतेमुळे विजेचा अपव्यय होऊन सामान्य नागरिकांना विनाकारण याचा आर्थिक भार उचलावा लागतो.

या निवेदनात सुराज्य अभियानाने केलेल्या महत्त्वपूर्ण सूचना

१. विजेचा अपव्यय टाळण्यासाठी योग्य वेळी पथदीप बंद होतील, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.

२. कर्तव्यात कसूर केल्याने विजेचा अपव्यय होण्यास कारणीभूत असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी.

३. दिवसा पथदीप चालू  आहेत का ?, हे पडताळण्यासाठी ‘गस्ती पथक’ नेमावे.

तुम्ही अत्यंत चांगले काम करत आहात ! – वल्लभ सामंत, कार्यकारी अभियंता, विद्युत् विभाग

सुराज्य अभियानाने वीजेच्या अपव्ययाविषयी समोर आणलेल्या प्रकाराविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना फोंडा येथील विद्युत् विभागाचे ‘डिव्हिजन १०’चे कार्यकारी अभियंता श्री. वल्लभ सामंत म्हणाले, ‘‘तुम्ही अत्यंत चांगले काम करत आहात. अन्य आमच्यावर केवळ टीका करतात. आता आम्ही नवीन यंत्रणा कार्यान्वित करत असून त्यामध्ये ‘स्वयंचलित कळ’ (ऑटो स्विच) आणि ‘टायमर’ बसवत आहोत. फोंडा येथे या कामाचा आरंभ झाला आहे.’’