संभाजीनगर – येथील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची २७ सप्टेंबर या दिवशी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.या सभेच्या वार्षिक अहवालात भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि डॉ. भागवत कराड यांचे नाव वगळून उर्वरित प्रमुख लोकप्रतिनिधींच्या छायाचित्रांसह नाव आणि पद यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून सभेवर बहिष्कार घातला.
भाजपचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राम शेळके यांनी २ मंत्री आणि आमदार यांची छायाचित्रांसह नावे का घेतली नाही ? असा जाब सचिव विजय शिरसाठ यांना विचारला. त्यावर शिरसाठ यांनी ‘प्रशासक मंडळाच्या निर्देशानुसार मी माझे काम केले आहे’, असे सांगितले, तर मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे यांनी ‘सचिवांनी काय केले आहे, त्याची माहिती दिली नाही. यापुढे असे होणार नाही’, असे म्हणून दिलगिरी व्यक्त केली. त्यावर समाधान न झालेल्या भाजपच्या पदाधिकार्यांनी घोषणा देऊन सभात्याग केला. सरकार आणि प्रशासकीय मंडळ यांच्या कारभाराचा निषेध व्यक्त करून ते निघून गेले.