१. श्री. प्रवीण देसाई यांच्या कवितेला चाल लावून ती म्हणून दाखवल्यावर भावाश्रू येणे
‘४.३.२०२० या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये श्री. प्रवीण देसाई यांची अनुभूती छापून आली होती. ती माझ्या वाचनात आली आणि मला वर्ष – दीड वर्षापूर्वीची आठवण झाली. श्री. प्रवीण देसाई यांची एक कविता दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाली होती. तेव्हा मी रुग्णाईत होतो आणि नुकताच देवद आश्रमात आलो होतो. ती कविता अशी होती, ‘याचक म्हणोनि आलो । आलो तुझिया द्वारी । देवा कृपा करी रे कृपा करी ।।’ या कवितेला मी चाल लावली आणि त्यांना बोलावून त्यांची कविता त्यांना चालीसहित म्हणून दाखवली. तेव्हा त्यांना अश्रू आवरता येईना.
२. श्री. प्रवीण देसाई यांच्यामुळे कविता लिहू लागल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आपला आवाज ऐकावा’, अशी इच्छा व्यक्त करणे आणि ती पूर्णही झाल्याने जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटणे
श्री. प्रवीण देसाई यांच्यामुळे मीही कविता लिहू लागलो. माझी कविता अशी होती, ‘मन माझे आहे तृप्त । ने मज आता तुझ्या दर्शनाला । तुझा हा दास सुधा । ने मज आता पैलतिरा ।।’ मी देवद आश्रमातील साधक श्री. नंदकिशोर नारकर यांना ‘गुरुदेवांनी माझा आवाज ऐकावा’, असे पुष्कळ वेळा म्हणालो होतो. मला ती संधी चालून आली. २३.२.२०२० या दिवशी माझे ध्वनीचित्रीकरण झाले. तेव्हा प्रथमच मी प.पू. भक्तराज महाराज यांचे एक भजन आणि स्वतः चाली लावलेल्या माझ्या ५ – ६ कविता अन् ‘प्रतापगडचा शिवप्रताप’, हा पोवाडा म्हटला.
महाशिवरात्रीच्या दिवशी आश्रमातील श्री. प्रभाकर प्रभुदेसाई मला म्हणाले, ‘‘तुम्ही आश्रम गाजवलात.’’ मी रुग्णाईत असल्यामुळे मला काही कळले नाही. तेव्हा श्री. नारकर यांनी मला सांगितले, ‘‘तुमचा आवाज गुरुदेवांनी ऐकला.’’ त्या वेळी मला माझ्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. ‘मला किती आनंद झाला’, हे सांगण्यास माझी लेखणी अपुरी पडेल.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !’
– श्री. सुधाकर केशव जोशी (वय ९१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.३.२०२०)