गोव्यात विशेष ‘चार्टर्ड विमाने’ येण्यासाठी केंद्रशासनाची अनुमती मिळेल ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

पणजी, २८ सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यात ३१ ऑक्टोंबरपर्यंत सर्व पात्र असलेल्या गोमंतकियांनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतल्यानंतर गोवा राज्य हे सर्वांत सुरक्षित राज्य असल्याचे आम्ही सर्वांना सांगू शकणार आहे. गोव्यात विशेष ‘चार्टर्ड विमाने’ चालू करण्याची मागणी केंद्रशासनाकडे केली आहे आणि पुढील काही दिवसांत आम्हाला यासाठी अनुमती मिळेल, अशी आशा आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. कांदोळी येथे पर्यटन पोलीस साहाय्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘मोपा विमानतळ १५ ऑगस्ट २०२२ मध्ये आणि दोनापावला येथील ३०० खोल्यांचे ‘कन्व्हेंशन सेंटर’ पुढील ५ वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. एक खिडकी योजना कार्यान्वित करून राज्यात चित्रपटांच्या चित्रीकरणाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. पर्यटन पोलीस साहाय्य केंद्रासाठी १०० पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागरिकांनी देशी आणि विदेशी पर्यटक यांना चांगली वागणूक दिल्यास पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल. नजीकच्या काळात नागरिकांसमवेत अयोग्य वर्तन केलेल्या १५ पोलीस कर्मचार्‍यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.’’