१ ऑक्टोबरपर्यंत भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित न केल्यास २ ऑक्टोबरला जलसमाधी घेईन ! – अयोध्येतील महंत परमहंस दास यांची चेतावणी

  • धर्मबळ असलेल्या हिंदूंचे परिणामकारक संघटन झाल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना निश्चित ! – संपादक
  • हिंदूबहुल देशात संत-महंतांना अशी चेतावणी द्यावी लागते, हे हिंदूंना लज्जास्पद ! संतांच्या नेतृत्वाखाली ही मागणी लावून धरण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे वैध मार्गांनी प्रयत्न करणे आवश्यक ! – संपादक
  • या आधीही अनेक संत-महंतांनी गंगानदीच्या शुद्धीकरणासाठी किंवा हिंदूंच्या अन्य मागण्यांसाठी आमरण उपोषण करणे, यांसारख्या कृती केल्या आहेत; मात्र त्याचा सरकारी यंत्रणांवर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे जलसमाधी घेऊन नव्हे, तर परिणामकारक हिंदूसंघटनाद्वारेच हिंदु राष्ट्र येऊ शकते, हे लक्षात घ्या !  – संपादक
अयोध्येतील महंत परमहंस दास

अयोध्या – १ ऑक्टोबरला देशभरात एका मोठ्या धर्मसंसदेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित केले जाईल; मात्र तोपर्यंत केंद्र सरकारने काहीच निर्णय घेतला नाही, तर मी शरयू नदीमध्ये २ ऑक्टोबरला समाधी घेईन, अशी चेतावणी महंत परमहंस दास यांनी दिली आहे. अयोध्येत झालेल्या सनातन धर्मपरिषदेत त्यांनी ही चेतावणी दिली.

१. महंत परमहंस दास म्हणाले की, ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये धर्माच्या आधारे घोषणा केल्या जातात, ते पहाता भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केले नाही, तर हिंदू अल्पसंख्यांक होतील. हे टाळण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची घोषणा करणे अत्यावश्यक आहे.

२. काही मासांपूर्वी महंत परमहंस दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र पाठवून ‘भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केले नाही, तर आत्मदहन करीन’, अशी चेतावणी दिली होती. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष आत्मदहनाची सिद्धताही केली होती; मात्र ऐनवेळी पोलिसांनी घटनास्थळी येऊन हा प्रकार रोखला होता.