अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय रहित करा ! – राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी

बेळगाव (कर्नाटक), २६ सप्टेंबर – अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय रहित करावा. कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा आणि हिरण्यकेशी या नद्यांवर जे पूल बांधण्यात आले आहेत, त्या पुलांच्या दोन्ही बाजूस २-२ किलोमीटर भराव आहेत. महापुराच्या काळात पुराचे पाणी या बंधार्‍यांमुळे संथगतीने अल्प होते. चिकोडी तालुक्यातील अंकली-मांजरी पुलाच्या भरावामुळे शिरोळ, हातकणंगले, निपाणी तालुक्यांत पूरस्थिती गंभीर होते. त्यामुळे हे भराव अल्प करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे २६ सप्टेंबर या दिवशी प्रत्यक्ष भेट घेऊन केली.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी तातडीने उपाययोजना म्हणून पुलांचे भराव अल्प केले जातील, महापूर नियंत्रणासाठी अभ्यासगट नेमून केंद्रीय जल आयोगाकडे पत्रव्यवहार करू, तसेच पुढील उपाययोजनांसाठी मंत्रालयात बैठक आयोजित करू, असे आश्वासन दिले. या वेळी कर्नाटक राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचे समन्वयक मंत्री शंकरगौडा, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांसह अन्य जण उपस्थित होते.