५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. नचिकेत पराग भोपळे (वय ५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. नचिकेत पराग भोपळे एक आहे !

पारनेर, नगर येथील चि. नचिकेत पराग भोपळे याचा आज भाद्रपद कृष्ण पक्ष षष्ठी (२७.९.२०२१) या दिवशी पाचवा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आईला त्याच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

चि. नचिकेत पराग भोपळे

चि. नचिकेत पराग भोपळे याला पाचव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. जन्मापूर्वी

१ अ. श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन चालू असतांना गर्भातील बाळ शांतपणे ऐकत असल्याचे जाणवणे : ‘नचिकेतच्या गर्भारपणाच्या वेळी मला देवाचा नामजप करणे आणि पोथीवाचन करणे यांची आवड होती. मला आठ मास झाले असतांना आमच्या घरी ‘श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथाचे वाचन होत होते. त्या वेळी मला पुष्कळ चांगले वाटायचे आणि ‘गर्भातील बाळ गीतापाठ शांतपणे ऐकत आहे’, असे जाणवायचे.

१ आ. मुलगा होणार असल्याची पूर्वसूचना मिळणे : माझी प्रसुती होण्याच्या आठ दिवस आधी मला एक स्वप्न पडले. कुणीतरी मला जागे केले आणि सांगितले, ‘तुला मुलगा झाला.’ त्या वेळी मला आश्चर्य वाटले; कारण मला पहिला मुलगा होता आणि आता मुलगी हवी होती. त्यानंतर आठव्या दिवशी (२१.९.२०१६ या दिवशी) मला मुलगा झाला. तेव्हा ‘भगवंताने पूर्वसूचनेच्या संदर्भातील ही अनुभूती आधीच दिली होती’, असे माझ्या लक्षात आले.

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते १ वर्ष : बाळाचा तोंडवळा हसरा आणि सात्त्विक असल्याने त्याला बघून सगळे मोहित व्हायचे. तो श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहात असे.

२ आ. वय – १ ते २ वर्षे

२ आ १. चि. नचिकेत पुष्कळ प्रेमळ अन् मनमिळाऊ आहे.

२ आ २. नम्रता : तो पुष्कळ नम्रतेने वागतो. सर्वांशी आदराने बोलतो आणि स्वत:च्या प्रेमळ वाणीने सर्वांना आपलेसे करतो.

२ आ ३. नामजपाची आवड : त्याला भगवान श्रीकृष्ण पुष्कळ आवडतो. तो आजीसमवेत देवघरात जाऊन बसतो. तो दोन वर्षांचा होता. तेव्हा आजीसमवेत ‘हरे राम हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’ हा जप करत असे.

२ इ. वय – २ ते ४ वर्षे

सौ. राधिका भोपळे

२ इ १. देवाची आवड : प्रतिदिन स्नान झाले की, नामजप करणे, सूर्याला अर्घ्य (जल) देणे आणि सायंकाळी नामजप करणे, असे नचिकेत करतो. मी जेव्हा पूजापाठ करते, तेव्हा तो माझ्यासमवेत देवपूजा करतो. देवाला स्नान घालतो आणि फुले वहातो. देवाला नैवेद्य दाखवल्याविना तो खात नाही. मी पोथी वाचायला आरंभ केल्यावर तोसुद्धा माझ्याप्रमाणेच शब्द उच्चारायचा प्रयत्न करतो.

२ इ २. चुकांविषयी संवेदनशील असणे : कधी नचिकेतने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या भावाला उलट उत्तर दिले, तर थोड्या वेळाने तो त्याची क्षमा मागतो. तो स्वत:ची चूक देवाला सांगतो. ‘दुसर्‍यांविषयी वाईट बोलू नये. देव पाप देतो (करतो)’, असे तो म्हणतो.

२ इ ३. श्रीकृष्णाची भक्ती करणारा बाल नचिकेत

२ इ ३ अ. प्रत्येक चांगली-वाईट गोष्ट कृष्णाला सांगणे आणि ‘कृष्णाला तुमच्या समवेत पाठवल्याने तो तुमचे रक्षण करील’, असे वडिलांना सांगणे : ३ वर्षांपासून तो कृष्णाची भक्ती करत आहे. कोणतीही गोष्ट करतांना तो कृष्णाला सांगतो आणि ‘कृष्ण सतत माझ्यासमवेत असतो’, असे म्हणतो. वडील बाहेरगावी जातांना तो प्रत्येक चांगली किंवा वाईट गोष्ट कृष्णाला सांगतो. तो त्याच्या वडिलांना बाहेरगावी जातांना सांगतो, ‘‘मी तुमच्यासमवेत कृष्णाला पाठवतो. तो तुमचे रक्षण करील अन् तुम्हाला लवकर घरी घेऊन येईल.’’ त्याला काही दुखापत झाल्यास, ‘कृष्ण मला बरे करतो’, असे तो म्हणतो.’

२ इ ३ आ. रामनाथी आश्रमात गेल्यापासून नचिकेतच्या आचरणात पालट जाणवून त्याच्यात श्रीकृष्णाची भक्ती करण्याची आवड निर्माण होणे : डिसेंबर २०१९ मध्ये आम्ही सहकुटुंब रामनाथी (गोवा) आश्रमात गेलो होतो. तेव्हापासून त्याच्या आचरणात पालट जाणवत आहे. रामनाथीला तो श्री. अमोल हंबर्डे आणि श्री. रवी बनसोड या साधकांसमवेत राहिला. तेव्हापासून त्याची श्रीकृष्णाची भक्ती करण्याची आवड वाढली.

२ इ ३ इ. ‘साधिकेने मला कृष्ण दे’, असे म्हटल्यावर ‘तुम्हाला दिल्यावर माझ्याजवळ कृष्ण रहाणार नाही’, असे सांगणार्‍या बाल नचिकेतचे कृष्णप्रेम ! : अमरावती येथील साधिकेने, सौ. रावळेकाकूंनी भ्रमणभाषवरून बोलतांना एकदा त्याला म्हटले, ‘‘मला तुझा कृष्ण दे.’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘मी कृष्ण देत नाही. तो माझा आहे आणि तुम्हाला दिल्यावर माझ्याकडे कृष्ण रहाणार नाही.’’ आम्हाला त्याच्या वागण्याचे आश्चर्य वाटले अन् कृष्णावर असलेले त्याचे प्रेम बघून पुष्कळ चांगले वाटले.

२ इ ३ ई. ‘वडिलांचे रक्षण कृष्ण करणार आहे’, याविषयी नचिकेतच्या मनात असलेली श्रद्धा आणि ‘श्रीकृष्ण नचिकेतची प्रार्थना ऐकतो’, याविषयी आलेली अनुभूती : १.६.२०२० या दिवशी ‘सगळीकडे वादळ येणार’, असे सांगितले होते आणि त्या दिवशी त्याच्या वडिलांना बाहेरगावी जावे लागणार होते. मी म्हटले, ‘‘गाडीवरून जावे लागते, तर जाऊ नका.’’ नचिकेत लगेच कृष्णाला प्रार्थना करायला गेला आणि वडिलांना म्हणाला, ‘‘बाबा तुम्ही जा. मी कृष्णाला सांगितले, ‘माझ्या बाबांसमवेत जा.’ आता तुमच्या समवेत कृष्ण आहे आणि तो तुमचे रक्षण करील.’’ त्या वेळी माझे मन लागत नव्हते आणि मी सारखी चिंतेत होते. तेव्हा तो कृष्णाला म्हणाला, ‘‘कृष्णा, माझ्या बाबांना लवकर घरी घेऊन ये.’’ नंतर दहा-पंधरा मिनिटांतच त्याचे बाबा घरी आले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘बाबा, कृष्णाने तुम्हाला लवकर घरी आणले. तेही वादळ येण्याआधीच आणले.’’ त्याचे वडील दुपारी दोन वाजता घरी आले आणि तीन वाजता आमच्याकडे मोठ्या प्रमाणात वादळ चालू झाले. त्यावरून आम्हाला समजले की, कृष्ण नचिकेतची प्रार्थना ऐकतो.’

– सौ. राधिका भोपळे (चि. नचिकेतची आई), पारनेर, नगर. (१.८.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक