भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी घेतली पीडित आणि कुटुंबीय यांची भेट

महाबळेश्वर येथील महिलेवरील अत्याचाराचे प्रकरण

चित्रा वाघ

सातारा, २६ सप्टेंबर (वार्ता.) – महाबळेश्वर येथील महिलेवरील अत्याचार प्रकरणाची माहिती घेण्यासाठी चित्रा वाघ सातारा जिल्ह्यात आल्या होत्या. त्यांनी महाबळेश्वर येथे जाऊन पीडित आणि कुटुंबीय यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. नंतर सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई आणि सतेज पाटील यांच्यावर टीका केली.

चित्रा वाघ या वेळी म्हणाल्या की, महाबळेश्वर येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणात आता गंभीर गोष्टी समोर येत आहेत. प्रथम या प्रकरणात २ संशयित होते; मात्र आता अजून काही जणांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील काही जण पळून गेले (फरार झाले) आहेत. या प्रकरणात एका अधिवक्त्याचाही समावेश आहे. हे प्रकरण समोर आल्या-आल्या पोलिसांनी त्याला कह्यात का घेतले नाही ? हा प्रश्न अजूनही शेष आहे. या प्रकरणात महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बावळेकर यांची मुले सहभागी आहेत. हे प्रकरण राजकीय दबावाखाली हाताळण्यात येत असून याचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही आगामी काळात आंदोलन करणार आहोत.