पाकने पाकव्याप्त काश्मीर रिकामी करावे !

पाकव्याप्त काश्मीरमधील राजकीय पक्षांकडून संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेच्या मुख्यालयाबाहेर निदर्शने करत मागणी !

  • अशी मागणी करण्याची वेळ पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांवर का आली ? गेली अनेक दशके पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिकांवर अत्याचार होत आहेत, तेथे आतंकवाद्यांना प्रशिक्षण देणारी केंद्रे आहेत, हे जगजाहीर असतांना संयुक्त राष्ट्रांची मानवाधिकार  संघटना आंधळी, बहिरी आणि मुकी असल्याप्रमाणे का वागत आहे ? – संपादक
  • केवळ संयुक्त राष्ट्रेच नव्हे, तर जागतिक समुदायालाही पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची स्थिती ठाऊक आहे; मात्र कुणीही त्यांचे साहाय्य करायला पुढे येत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक

जिनेवा (स्वित्झर्लंड) – येथे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेच्या मुख्यालयाबाहेर पाकव्याप्त काश्मीरमधील राजकीय कार्यकर्त्यांनी पाकच्या विरोधात निदर्शने केली. पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना प्रशिक्षण देणारी केंद्रे उभारली आहेत. ही बंद करावीत, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. ‘युनायटेड कश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी’, ‘स्विस कश्मीर ह्यूमन राईट्स’ आणि ‘जम्मू कश्मीर इंटरनॅशनल पीपल्स अलायंस’ या संघटनांनी संयुक्तरित्या ही निदर्शने केली. या वेळी या कार्यकर्त्यांनी संयुक्त राष्ट्रांना निवेदनही सादर केले.

पाकव्याप्त काश्मीरमधील निर्वासित नेते सरदार शौकत अली कश्मिरी यांनी सांगितले की, पाकने आमचा छळ केला आहे. आमच्यावरील पाकिस्तानची सत्ता हटवावी. आमच्या संस्कृतीला हानी पोचवली जात आहे. पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान येथीलच नव्हे, तर बलुच आणि सिंध प्रांत येथील लोकही पाकमुळे त्रस्त आहेत. आम्ही पाकला घाबरणार नाही. आम्ही आमच्या ऐतिहासिक मूलभूत अधिकारांसाठी संघर्ष करत राहू.