शिर्डी येथील साई मंदिराच्या बांधकामात पालट केल्याने नवा वाद !

पुरातत्व विभाग आणि आतंकवादविरोधी पथक यांपैकी कुणाचीही अनुमती घेतली नाही !

शिर्डी (नगर), २४ सप्टेंबर- जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साई मंदिर आतंकवाद्यांच्या निशाण्यावर असल्यामुळे त्यास विशेष सुरक्षा पुरवण्यात आली आहे, तसेच साई मंदिराच्या बांधकामास १०० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यामुळे त्यात काही पालट करायचा असेल, तर आतंकवादविरोधी पथकासह पुरातत्व विभाग आणि तज्ञ यांचाही सल्ला घेणे आवश्यक आहे. असे असूनही साई संस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी विश्वस्त समिती, पुरातत्व विभाग आणि आतंकवादविरोधी पथक यांपैकी कुणाचीही अनुमती न घेता साई मंदिराच्या बांधकामात काही पालट केले, ही गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे याविषयी आवाज उठवणार आहोत, असे माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी सांगितले.

काळे पुढे म्हणाले की, बगाटे यांनी येथील कार्यकाळात लाखो रुपये व्ययाची देयके संबंधित समितीची अनुमती न घेता अदा केली आहेत. त्यांची चौकशी व्हावी, तसेच साई मंदिर सुरक्षेचे परीक्षण केले जावे, अशा मागण्या आपण संबंधित विभागाकडे केल्या आहेत. (यावरून मंदिरांच्या विश्वस्त मंडळावर केवळ भक्तांचीच नियुक्ती करणे का आवश्यक आहे, हे लक्षात येते. – संपादक)