रायपूर (छत्तीसगड) महानगरपालिकेने श्री गणेशमूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेल्याचा आणि विसर्जनस्थळी त्या फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघड !

हिंदूंमध्ये संताप !

  • श्री गणेशाच्या या घोर विडंबनाच्या प्रकरणी हिंदूंनी छत्तीसगडमधील काँग्रेसशासित सरकारला वैध मार्गाने जाब विचारायला हवा ! – संपादक
  • आतापर्यंत अनेक ठिकाणी श्री गणेशाचा अशा प्रकारे अवमान होऊनही एकालाही कठोर शिक्षा झालेली नाही, हे लक्षात घ्या ! यासाठी हिंदूंनी संघटित होऊन संबंधितांना कायदेशीर शिक्षा होण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करा ! – संपादक
  • प्रत्येक वर्षीच्या गणेशविसर्जनाच्या वेळी अनेक ठिकाणी श्री गणेशमूर्तींची अशाप्रकारे प्रशासकीय स्तरावरूनच विटंबना केली जाते. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करणार्‍या आणि भगवंताप्रती भाव असलेल्या शासनकर्त्यांच्या ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापन करणे, हाच यावर एकमेव उपाय आहे, हे जाणा ! – संपादक
प्रतिमात्मक छायाचित्र

रायपूर (छत्तीसगड) – अनंतचतुर्दशीच्या दिवशी रायपूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या नावाखाली त्यांना कचर्‍याच्या गाडीतून नेल्याचा आणि त्या कृत्रिम तलावात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला. याविषयीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर हिंदूंनी संताप व्यक्त केला. महानगरपालिकेच्या प्रशासनाने विसर्जनासाठी घराघरांतून श्री गणेशमूर्ती जमा केल्या होत्या. यावर हिंदूंनी ‘जर महानगरपालिकेला श्री गणेशमूर्तींचे विधीवत् विसर्जन करणे शक्य नव्हते, तर त्यांनी घराघरांतून मूर्ती कशासाठी नेल्या ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला. यासह ‘यास महानगरपालिकेचे प्रशासन आणि सरकार उत्तरदायी असून संबधित अधिकारी अन् कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करावे’, अशी मागणीही हिंदूंनी केली.

प्रशासनाचे कृत्य अक्षम्य ! – भाजप

या प्रकरणी भाजपजे प्रदेशाध्यक्ष विष्णुदेव साय म्हणाले, ‘‘धर्माशी खेळ करणे, ही काँग्रेसची सवयच आहे. श्री गणेशमूर्ती कचर्‍याच्या गाडीतून घेऊन जाणे, हा कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे. प्रशासनाचे हे कृत्य अक्षम्य आहे. सरकारने उत्तरदायी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.’’

(म्हणे) ‘कचर्‍याच्या गाडीतून कुठल्याही मूर्ती नेण्यात आल्या नाहीत !’ – महापौर एजाज ढेबर

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना रायपूरचे महापौर एजाज ढेबर म्हणाले, ‘‘महानगरपालिकेच्या कचर्‍याच्या गाडीतून कुठल्याही मूर्ती नेण्यात आल्या नाहीत. मी स्वतः ‘महादेव विसर्जन घाटा’वरील कुंडाजवळ जाऊन लोकांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. महानगरपालिकेच्या काही कर्मचार्‍यांकडून विसर्जनाच्या वेळी निष्काळजीपणा झाला. त्यांच्याकडून ते काम आता काढून घेण्यात आले आहे. मी व्यवस्थेमध्ये पालट करण्याचे निर्देश दिले आहेत. काही लोक यामध्ये राजकारण करत आहेत. त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी अशा प्रकरणांत राजकारण करू नये.’’ (चूक लक्षात आल्यावर संबंधित कर्मचार्‍यांकडून काम काढून घेतले, तरी ‘गणेशमूर्तींचे काय केले’, यावर मात्र महापौर यांनी मौन बाळगले आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)