परमबीर सिंह यांच्या विरोधातील चौकशीला गृहविभागाची अनुमती !

अवैध कृत्य आणि भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपये कमावल्याचे प्रकरण

परमबीर सिंह

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात आणखी एका प्रकरणात उघड चौकशी करण्याची अनुमती गृह विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली आहे. अवैध कृत्य आणि भ्रष्टाचार करून सिंह यांनी कोट्यवधी रुपये कमावल्याचा त्यांच्यावर या प्रकरणात आरोप आहे.

यापूर्वी पोलीस निरीक्षक अनुप डांगे प्रकरणात परमबीर सिंह यांच्या विरोधात चौकशी करण्यास गृह विभागाने मान्यता दिली होती. पोलीस निरीक्षक बी.आर्. घाडगे यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे सिंह यांच्या विरोधात अवैध कृत्य आणि भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपये कमावल्याची तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणी गोपनीय चौकशीला प्रारंभ केला होता. चौकशीत तथ्य आढळल्यानंतर त्यांनी उघड चौकशी करण्यासाठी गृह विभागाकडे अनुमती मागितली होती. त्यानुसार ती अनुमती देण्यात आली.