सातारा, २२ सप्टेंबर (वार्ता.) – आतापर्यंत सातारा पोलीस दलातील ‘बाँब शोधक पथका’मध्ये केवळ पुरुष पोलीस कर्मचारी कार्यरत होते; मात्र जिद्दीच्या जोरावर पोलीस नाईक मोना निकम यांनी सातारा पोलीस दलातील पहिली महिला ‘बाँब टेक्निशन’ होण्याचा मान मिळवला आहे. एवढेच नव्हे, तर मोना निकम या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या महिला ‘बाँब टेक्निशन’ ठरल्या असून त्यांच्या या कामगिरीमुळे सातारा पोलीस दलाचे नाव पश्चिम महाराष्ट्रात झाले आहे.
वर्ष २००७ मध्ये मोना निकम यांनी सातारा पोलीस दलात नोकरी स्वीकारली. गत १४ वर्षांपासून त्या सातारा शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे कर्तव्य पार पाडत आहेत. आता त्यांनी ‘बाँब टेक्निशन’चे प्रशिक्षण पूर्ण करून बाँब शोधक पथकामध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. हे पथक जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली कार्य करते. बाँब कसा हाताळायचा ? तो कसा बनवायचा ? वजनदार पोशाख घालून काम कसे करायचे ? याविषयीचे प्रशिक्षण त्यांनी तज्ञांकडून घेतले आहे.