मुलांची संख्या अल्प झाल्याने १४ सरकारी प्राथमिक शाळा बंद !

पणजी, २२ सप्टेंबर (वार्ता.) – २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये हजेरीपटावर मुलांची संख्या अत्यल्प झाल्याने राज्यातील १४ सरकारी प्राथमिक शाळा बंद झाल्या आहेत. सरकारी प्राथमिक शाळांपैकी पेडणे तालुक्यातील ४, डिचोली तालुक्यातील ३, फोंडा, सांगे आणि केपे या तालुक्यांतील प्रत्येकी २ आणि तिसवाडी तालुक्यातील १, अशा एकूण १४ शाळा बंद झाल्या आहेत. या शाळांपैकी १२ शाळा मराठी माध्यमांतील, एक शाळा कोकणी माध्यमातील, तर १ शाळा उर्दू माध्यमातील आहे. वर्ष २०१९-२० मध्ये राज्यातील सरकारी शाळांची संख्या ७४२ होती, ती वर्ष २०२०-२१ मध्ये ७२८ झाली आहे. १० वर्षांपूर्वी राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांची संख्या १ सहस्रहून अधिक होती. (सरकारी प्राथमिक शाळांची गुणवत्ता सुधारली नाही आणि मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण बंधनकारक केले नाही, तर काही वर्षांनी सर्वच सरकारी प्राथमिक शाळा बंद पडलेल्या आढळतील ! – संपादक)