हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हा विधी ‘कन्यामान’च !
क्षमा मागत नाही, तोवर ‘हिंदु समाजाने ‘मान्यवर ब्रँड’वर बहिष्कार घालण्याचे आवाहन – संपादक
मुंबई – हिंदु धर्मातील ‘विवाह संस्कार’ हा एक महत्त्वाचा संस्कार मानला गेला आहे. विवाह विधींतील ‘कन्यादान’ हा एक महत्त्वाचा धार्मिक विधी असून कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. असे असतांना नुकताच ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या आस्थापनाने ‘मान्यवर’ या कपड्यांच्या प्रसिद्ध ‘ब्रँड’चे (प्रसिद्ध आस्थापनाचे) एक विज्ञापन प्रसारित केले आहे. त्यामध्ये ‘कन्यादान कसे चुकीचे आहे ?’, तसेच ‘दान करायला कन्या वस्तू आहे का ?’ असे प्रश्न उपस्थित करत ‘आता कन्यादान नव्हे, तर कन्यामान’, असा परंपरा पालटण्याचा संदेश दिला आहे. हे विज्ञापन हिंदु धर्मातील धार्मिक कृतींचा चुकीचा अर्थ काढून अपप्रचार करणारे, धार्मिक कृतींचा अपमान करणारे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. हिंदु जनजागृती समिती या विज्ञापनाचा निषेध करते. हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हा विधी मुळातच कन्येचा सन्मान करणारा अर्थात्च ‘कन्यामान’ आहे. त्यामुळे ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ला या आस्थापनाने हे विज्ञापन त्वरित मागे घेऊन हिंदूंची विनाअट क्षमा मागावी. जोवर ते क्षमा मागत नाही, तोवर ‘हिंदु समाजाने मान्यवर ब्रँडवर बहिष्कार घालावा’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.
#Boycott_Manyavar
हिन्दू धर्म का ‘कन्यादान’,‘कन्यामान’ ही है; ‘मान्यवर’ ब्रांड हिन्दुओं से क्षमा मांगकर विज्ञापन हटाए अन्यथा बहिष्कार ! https://t.co/PfVKNTeI9H— HJS Mumbai (@HJSMumbai) September 22, 2021
या प्रसिद्धीपत्रकात श्री. शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की,
१. या विज्ञापनातून ‘कन्यादान’ विधी हा एकप्रकारे महिलांचा अपमान असल्याचे दर्शवले आहे. मुळात या विधीद्वारे कन्यादान करतांना वराकडून वचन घेतले जाते. कन्या काही वस्तू म्हणून दिली जात नाही, तर वधूपिता वधूचा हात वराच्या हाती सोपवतांना सांगतात, ‘विधात्याने मला दिलेले वरदान, जिच्यामुळे माझ्या कुळाची भरभराट झाली, ती तुझ्या हाती सोपवत आहे. ती तुझ्या वंशाची वृद्धी करणार आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चारही गोष्टींत तिची प्रतारणा करू नकोस, तिच्याशी एकनिष्ठ रहा आणि दोघांनी सुखाचा संसार करा.’ त्यावर वर म्हणतो, ‘तुम्हाला दिलेल्या वचनाचे मी उल्लंघन करणार नाही.’ इतका श्रेष्ठ असा हा विधी असतांना वरील ‘ब्रँड’ने तथाकथित पुरोगामीपणा दाखवत हेतूतः बुद्धीभेद करून हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचा प्रयत्न आहे.
२. हिंदु धर्मात स्त्रियांना जेवढा सन्मान दिला आहे, तो जगभरातील कोणत्याही धर्मात दिला गेलेला नाही; किंबहुना काही प्रस्थापित धर्मांत तर स्त्रीला ‘मानव’ म्हणूनही वागणूक दिली जात नाही. हिंदु धर्मात स्त्रीला देवीचे स्थान दिले आहे. तिचे पूजन केले जाते. पत्नीखेरीज धार्मिक विधींना आरंभच होऊ शकत नाही. असे असतांनाही हिंदूंनाच लक्ष्य केले जात आहे. सद्यःस्थितीत ‘हलाला’, ‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ या प्रथा, तसेच ‘स्त्री ही सैतान आहे’, असे मानणारी विचारसरणी अस्तित्वात आहे, याविषयी कुणी विज्ञापन सिद्ध करणे तर सोडाच; पण साधा निषेध करायलाही पुढे येत नाहीत. सामाजिक स्वास्थ टिकून रहण्यासाठी ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ आस्थापनावर गुन्हा नोंदवून कारवाई करावी आणि विज्ञापनांसाठीही ‘सेन्सॉर बोर्ड’ स्थापन करावे, अशा मागण्या आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत.