मुंबईसह नवी मुंबईमध्ये श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्रोताला प्राधान्य !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – मुंबईत अनंतचतुर्दशीला सकाळी ११ वाजता  श्री गणेशमूर्ती विसर्जनाला आरंभ झाला. २० सप्टेंबरला सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ३४ सहस्र ४५२ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. मुंबईमध्ये कृत्रिम तलावांत १३ सहस्र ४४२ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बहुतांश मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांत झाले.

मुंबई, नवी मुंबई या भागांमध्ये गेले दीड वर्ष कोरोनाचा संसर्ग असल्याने निर्बंध लागू आहेत. या पार्श्वभूमीवर श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांना विसर्जनासाठी थेट समुद्र, तलाव आदी ठिकाणी पाण्यात जाण्यास प्रतिबंध होता. मुंबईत एकूण ७३ नैसर्गिक विसर्जनस्थळे आहेत. १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. ‘कृत्रिम तलावात भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे’, असे आवाहन महापालिकेने केले होते. पालिकेच्या कर्मचार्‍यांनी भाविकांकडून मूर्ती कह्यात घेऊन नैसर्गिक आणि कृत्रिम तलावात विसर्जित केल्या.

नवी मुंबईमध्ये ५ सहस्र ९३३ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन

नवी मुंबईमध्ये ५ सहस्र ८४३ घरगुती आणि ९० सार्वजनिक अशा एकूण ५ सहस्र ९३३ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये पारंपरिक २२ मुख्य विसर्जन स्थळांवर ३ सहस्र ४२१ घरगुती तसेच ७६ सार्वजनिक अशा ३ सहस्र ४९७ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. १५१ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये २ सहस्र ४२२ घरगुती आणि १४ सार्वजनिक अशा २ सहस्र ४३६ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.