२५.६.२०२१ या दिवशी सनातनचे ३५ वे संत पू. (कै.) वैद्य विनय निलकंठ भावे यांनी देहत्याग केला. त्यांच्याविषयी देवद आश्रमातील श्री. राजेंद्र दिवेकर यांनी वाहिलेली स्मृतीरूपी पुष्पांजली येथे दिली आहे.
१. पू. काकांनी संत, गुरु-शिष्य आणि भक्त यांच्या गोष्टी सांगून नामजपाचे महत्त्व सांगणे अन् त्याद्वारे सेवा, श्रद्धा आणि भक्ती यांचे महत्त्व मनावर बिंबवणे
‘वर्ष १९९७ पासून मी सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी जात होतो. त्या वेळी मी लहान असल्याने साधकांच्या समवेत साप्ताहिक वितरण आणि सत्संग एवढीच सेवा करत होतो. त्यामुळे आनंद मिळत होता; पण ‘अध्यात्म म्हणजे काय ?’, हे मला कळत नव्हते. त्या वेळी सनातन संस्थेच्या वतीने बालसंस्कारवर्ग चालू नव्हते. पू. काकाच आम्हाला अध्यात्मातील काही संत, गुरु-शिष्य आणि भक्त यांच्या गोष्टी सांगून नामजपाचे महत्त्व सांगत. त्यातून सेवा, श्रद्धा आणि भक्ती यांचे महत्त्व मनावर बिंबवत असत.
आम्हाला सेवा करायला अडचण असेल किंवा कंटाळा आला असेल, तेव्हा पू. काका गोष्टी सांगून आमच्यातील उत्साह वाढवत आणि सेवा अन् नामजप करणे आदी कृती करवून घेत असत. पू. काकांमुळेच मला सेवेची गोडी लागली आणि पुढील साधनेचे मार्गदर्शन मिळाले.
२. अनेकांना आधार असणे
पू. भावेकाका यांचा स्वभाव शांत, लाघवी आणि प्रेमळ होता. वरसई (पेण, रायगड) हे ग्रामीण भागात असल्याने तिकडे आदिवासी लोक पुष्कळ मोठ्या प्रमाणात आहेत. पू. काकांकडे काही आदिवासी लोक वेगवेगळ्या कामांसाठी येत असत. तेव्हा पू. काका त्यांच्याशी त्यांना आवडेल, असा सहज संवाद साधत. त्यांच्या शेजारी बसून गप्पा मारणे, जेवण करणे, त्यांना आर्थिक साहाय्य करणे, एखाद्याची आर्थिक स्थिती फारच बिकट असेल, तर त्यांना सर्वतोपरी साहाय्य करत. काही वेळा स्वतः एखादा पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालत. ते अशा कृती करून पूर्णपणे त्यांच्यात मिसळून जात असत. त्यामुळे आदिवासी लोकांनाही पू. काकांविषयी पुष्कळ आदरभाव होता आणि त्यांना पू. काकांचा आधार होता.
३. प.पू. भक्तराज महाराज यांच्या समवेत केलेली साधना
३ अ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी येथील आश्रमात सेवेसाठी नेऊन गावातील लोकांमध्ये साधनेचे बीज रोवणे : पूर्वी काका प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या कांदळी (जिल्हा पुणे) येथील आश्रमात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने सेवेसाठी जात असत. तेव्हा ‘इतरांना या कार्यक्रमाचे महत्त्व कळावे आणि त्यांनाही लाभ व्हावा’, यासाठी ते गावातील भक्तांना १० ते १५ दिवस स्वखर्चाने सेवेसाठी समवेत घेऊन जात असत. त्यामुळे अजूनही आमच्याकडील आदिवासी वाडीत काही लोक प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त आहेत. ते अजूनही त्यांचे छायाचित्र देवघरात ठेवून पूजा करत आहेत. यातील काही लोक भाजीची लागवड करतात. काही वेळा ते त्यांच्या परीने शक्य होईल, तेवढी भाजी देवद आश्रमात अर्पण करतात.
३ आ. प.पू. भक्तराज महाराज आणि पू. काका यांच्यामुळे एका भक्ताचे मद्याचे व्यसन कायमचे सुटणे : प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी आश्रमात पू. काकांच्या समवेत गेलेल्या एका भक्ताला दारूचे व्यसन होते. एकदा रात्री झोपतांना काकांनी त्या भक्ताला काहीही न सांगता जिथे प.पू. भक्तराज महाराज बसून ध्यान आणि जप करत तिथे झोपायला सांगितले. त्या रात्री त्या भक्ताला झोपेत प.पू. भक्तराज महाराजांचे स्वप्न पडले आणि मार्गदर्शन झाले. त्यानंतर त्या भक्ताचे मद्याचे व्यसन कायमचे सुटणे. तेव्हा प.पू. भक्तराज महाराज आणि पू. काका यांच्यामुळेच त्या भक्ताच्या आयुष्यातील एक मोठी अडचण दूर झाली.
३ इ. पू. वैद्य भावे काकांच्या माध्यमातून प.पू. बाबांचे अस्तित्व अनुभवायला मिळाल्याने कृतज्ञता व्यक्त करणे : पू. काका अनेक वर्षे प.पू. भक्तराज महाराजांकडे सेवेसाठी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी जात असत. प.पू. बाबा ‘भजन आणि भंडारे या माध्यमातून संसारात राहून साधना कशी करायची ?’, हे शिकवत असत आणि मायेतील ब्रह्माची अनुभूती देत असत. पू. काकांनी बाबांची ही शिकवण स्वतःत रुजवली होती. पू. काकाही लोकांना जेवू घालणे, त्यांना नामजप करण्यास सांगणे, तसेच काही वेळा कार्यक्रमात भजनांचा कार्यक्रम ठेवून स्वतः भजने म्हणणे, असे करत असत. या सर्व कृती अनुभवतांना अनेकदा आम्हाला (मी आणि माझ्या समवेत असणारे साधक यांना) पू. काकांमध्ये प.पू. भक्तराज महाराज दिसायचे. भजन म्हणतांना ‘प्रत्यक्ष बाबाच बसले आहेत’, असे जाणवायचे. त्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष बाबांकडे जरी जाता आले नाही, तरी देवाने पू. काकांच्या माध्यमातून प.पू. बाबांचे अस्तित्व अनुभवायला दिले. यासाठी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
४. परात्पर गुरु पांडे महाराज यांची सेवा मनोभावे करून त्यांचे मन जिंकणे
पू. काका काही वर्षे देवद आश्रमात पूर्णवेळ सेवेला आले होते. त्या वेळी त्यांना परात्पर गुरु पांडे महाराज यांची सेवा मिळाली होती. तेव्हा पू. काकांनाही विविध आजार होते; परंतु त्याही स्थितीत त्यांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांची सेवा मन लावून केली. महाराज सकाळी लवकर उठायचे, तेव्हा त्यांना अंघोळीसाठी ऊन (गरम) पाणी देणे, त्यांची खोली आवरणे, त्यांना मर्दन करणे यांसारख्या सेवा त्यांनी मनोभावे केल्या. त्यामुळे त्यांनी महाराजांचे मन जिंकले होते.
५. भावेकाका संत होण्यापूर्वीच त्यांच्यातील संतत्व इतरांच्या लक्षात येणे
५ अ. पू. काकांच्या संपर्कात असलेल्या सर्व साधकांचा ते संत होण्यापूर्वीही ‘ते एक संतच आहेत’, असा भाव असणे : पू. काकांचे वागणे-बोलणे हे आधीपासूनच सात्त्विक होते. ते आमच्याशी कधीही व्यावहारिक न बोलता साधनेच्या संदर्भात बोलत असत. त्यामुळे त्यांच्या सहवासात असतांना आम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या क्षण अनुभवायला मिळत असत. तसेच काही साधकांना त्यांच्या संदर्भात अनुभूतीही येत असत. यामुळेच त्यांच्या संपर्कात असलेल्या सर्व साधकांचा ते संत होण्यापूर्वीही ‘ते एक संतच आहेत’, असा भाव असायचा. त्यांच्या संपर्कात असलेले सर्व साधक पू. काकांनी सांगितलेली सेवा किंवा साधनेची कृती आनंदाने आणि उत्साहाने करत असत.
५ आ. अन्य संप्रदायातील काही संतसुद्धा काकांना संत समजून त्यांना नमस्कार करत असणे : काही वेळा त्यांच्या समवेत बाहेरच्या संप्रदायातील काही संतांकडे भेटीला गेलो, तर ते संतसुद्धा काकांना संत समजून त्यांना नमस्कार करत असत. त्यांच्यातील चर्चाही आध्यात्मिक स्तरावरील असत. त्या वेळी आम्हाला त्यातील काही कळत नव्हते; परंतु काकांची साधना आणि अध्यात्मातील अधिकार माझ्या लक्षात आला. त्यानंतर काही वर्षांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. काकांना सनातनचे ३५ वे व्यष्टी संत म्हणून घोषित केले.
६. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणे
अ. समवेत असलेल्या साधकांच्या मनात ‘काय विचार आहेत ?’, तसेच ‘कुणाला काही आध्यात्मिक त्रास होत असेल’, तर पू. काकांना सूक्ष्मातून कळायचे. आध्यात्मिक त्रास होत असल्यास साधकाला स्वतःहून नामजप सांगून ते त्याच्याकडून नामजपादी उपाय करवून घेत असत. मायेतील किंवा नकारात्मक विचार असतील किंवा साधकाला निरुत्साह वाटत असेल, तर एखाद्या गुरु-शिष्याची गोष्ट सांगून त्याच्या मनातील ते विचार दूर करत असत.
आ. काही वेळा साधक त्याच्या घरी असतील आणि त्याला आध्यात्मिक त्रास होत असेल, तर पू. काका त्याच वेळी दूरभाष करून त्या साधकाची विचारपूस करून त्याला उपाय सांगत आणि अनौपचारिक बोलून त्या साधकाचा त्रास न्यून करत असत.
इ. एकदा मी पू. काकांच्या समवेत अलिबाग येथील धोकावडे या गावातील सत्संग संपवून पेणला परत येत होतो. रात्रीची वेळ होती. मला लघवीला लागल्याने मी गाडी थांबवून उतरलो. तेव्हा पू. काकांनी सांगितले, ‘‘इथे जागा चांगली नाही. क्षेत्रपालदेवतेला प्रार्थना करून आणि क्षमा मागून मगच लघवी कर.’’ मी त्याप्रमाणे कृती केली. तेव्हापासून माझ्याकडून अशीच कृती होते. यावरून ‘पू. काकांमध्ये सूक्ष्मातून जाणण्याची शक्ती होती’, हे लक्षात आले.
७. वरसई (तालुका पेण) गाव धरण क्षेत्रात येत असल्याने सरकारकडून झालेल्या अयोग्य प्रक्रियेला वाचा फोडून त्या कामाला गती देण्यास साहाय्य करणे
पू. काकांना अन्यायाविरोधात प्रचंड चीड होती. त्यांना अन्यायाविषयी काही समजायचे, तेव्हा ते इतरांना एकत्र करून किंवा स्वतः त्याविषयी आवाज उठवत. वरसई (तालुका पेण) आणि पंचक्रोशीतील अनेक गावे धरण क्षेत्रात येत असल्याने लोकांना गावे आणि भूमी सोडून जावे लागणार आहे. शासनाकडून त्याची भरपाई म्हणून जी मिळकत मिळणार आहे, ती अत्यल्प आहे. पुनर्वसन होणार्या शेतकर्यांच्या भूमीच्या माहितीचे संकलन करतांना शासकीय कर्मचार्यांकडून गंभीर आणि अक्षम्य त्रुटी राहिल्याने गरीब शेतकर्यांना भरपाई मिळण्यात पुष्कळ अडचणी येत आहेत, तर काही जणांना भरपाईच मिळणार नाही. गावाच्या संघर्ष समितीने काही प्रमाणात विरोध केला; पण कालांतराने काही कारणांमुळे विरोध अल्प झाला. तेव्हा पू. काकांनी इतर ४ – ५ जणांना एकत्र करून न्यायालयात दावा प्रविष्ट केला आणि धरणाच्या बांधकामावर ‘स्टे’ आणला. (काम थांबवण्याचा आदेश दिला.) तसेच या कामासाठी त्यांनी गावातील काही मुले आणि स्वतःच्या मुलालाही या कार्याला गती देणे आणि शासकीय कार्यालयात कायदेशीर प्रक्रिया करण्यास प्रेरणा दिली. याविषयी बोलतांना ते म्हणायचे, ‘‘मला याची आवश्यकता नाही; पण ज्या समाजात आपण रहातो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. समाजाचे ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे.’’ आयुष्याच्या शेवटपर्यंत पू. काकांनी या गोष्टीचा पाठपुरावा घेतला. या कार्यात जवळील व्यक्तींशी प्रसंगी त्यांनी वाईटपणासुद्धा घेतला. कालांतराने त्यांच्यातील गैरसमज दूर होऊन त्यांच्यात पुन्हा एकीही झाली.
८. अनुभूती – पू. काका अखंड नामजप करत असल्याने त्यांच्या सान्निध्यात आल्यावर बंद असलेला नामजप आपोआप चालू होणे आणि हे त्यांच्यातील चैतन्यामुळे होत असल्याचे लक्षात येणे
पू. काका आणि आमच्या कुटुंबाचे जवळचे संबंध असल्याने बर्याच वेळा त्यांचा सहवास सेवेनिमित्त आणि अनौपचारिकरित्या लाभला आहे. प्रत्येक वेळी मी जेव्हा जेव्हा त्यांच्या संपर्कात आलो, तेव्हा तेव्हा माझा बंद असलेला नामजप आपोआप चालू होत असे. पू. काका अखंड नामजप करत असत. प्रवासात असतांना, कुणाकडे बसलेले असतांना किंवा रस्त्याने, शेतावर चालत जात असतांना पू. काकांच्या हातात नेहमीच जपमाळ असे. त्यामुळे त्यांची आठवण कधी आलीच, तर आपोआप जपमाळ दिसायची आणि तेव्हाही बंद असलेला नामजप चालू व्हायचा. मी हे सूत्र लिहितांनासुद्धा माझा बंद असलेला नामजप चालू झाल्याचे माझ्या लक्षात आले. ‘पू. काकांच्या ठिकाणी असलेल्या चैतन्यामुळे हे होत आहे’, असे लक्षात आले.
९. कृतज्ञता
पू. काकांसारख्या अष्टपैलू आणि विविध गुण अंगी असणार्या संतांचा मला लहानपणापासूनच सहवास मिळणे, ही माझ्यावरची गुरुदेवांची कृपाच आहे. यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. राजेंद्र दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.६.२०२१)
औषधनिर्मिती एक साधना१. बनवलेल्या औषधांचे सूक्ष्मातून परीक्षण करून मगच ती इतर ठिकाणी पाठवणे : पू. काका बाहेर गेले आणि यायला विलंब झाला, तर त्यांच्या अनुपस्थितीतही त्यांच्या मार्गदर्शनानुसार आयुर्वेदिक औषधे बनवली जात असत. तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व झाले आहे का ? हे ते कामगारांकडून सर्व कृती विचारून घेत असत. त्यानंतर स्वतः कारखान्यात जाऊन सिद्ध औषधे हातात घेऊन काही वेळ ते डोळे मिटत आणि सूक्ष्मातून त्या औषधांचे परीक्षण करत असत आणि मगच ती इतर ठिकाणी पाठवत. २. आयुर्वेदिक सर्व औषधांच्या प्रक्रियेमध्ये कुठेही हलगर्जीपणा होऊ न देणे : पू. काका आयुर्वेदाचार्य असल्याने त्यांनी स्वतःच्या कारखान्यात जवळपास १५० आणि त्याहून अधिक औषधांची निर्मिती केली. ही सर्व औषधे पू. काका आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया करून औषधे सिद्ध करत असत. काही औषधे बनवायला काही दिवस, महिने लागतात. या कालावधीत त्या औषधांवर अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. तेव्हा ते औषध सिद्ध होते. या सर्व प्रक्रियेमध्ये ते कुठेही हलगर्जीपणा होऊ देत नसत. पू. काकांच्या निरपेक्ष भावामुळेच कमी भांडवलामध्ये इतकी औषधे सिद्ध केली जात होती. हे सर्वसामान्यांना सहज शक्य नाही. यामुळेच त्यांच्या औषधांना महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी मोठी मागणी असते. – श्री. राजेंद्र दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(२८.६.२०२१) |
|