‘आयुष’ विभागाचे वैद्य वाढीव वेतनाच्या प्रतीक्षेत !

पणजी, १९ सप्टेंबर (वार्ता.) – ‘राष्ट्रीय आरोग्य मिशन’च्या अंतर्गत गोव्यात कार्यरत असलेल्या वैद्यांना केंद्रशासनाकडून प्रतिमास २० ते ३० सहस्र रुपये वेतन दिले जाते. वर्ष २०१८ पासून सार्वजनिक आरोग्य खात्याच्या सूचनेनुसार या सर्व वैद्यांना न्यूनतम ५० सहस्त्र रुपये मासिक वेतन मिळावे, यासाठी प्रक्रियाही चालू झाली आहे. प्रत्येक वैद्यासाठी केंद्राकडून मिळणार्‍या वेतनामध्ये जो भेद आहे, ती रक्कम राज्यशासनाच्या वतीने देण्यासही संमती मिळाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ५ मे २०२१ या दिवशी यासंबंधीच्या धारिकेवर हस्ताक्षर केले आहे. या सर्व वैद्यांना एप्रिल २०२० पासून थकबाकी मिळेल, असेही ठरले आहे. गोव्यातील ११० वैद्यांना याचा लाभ होणार आहे आणि राज्यशासनाला यामुळे वर्षाकाठी ३ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित धारिकेवर स्वाक्षरी करून ४ मासांचा अवधी उलटूनही थकबाकी सोडाच, तर अजून वैद्यांना वाढीव मासिक वेतनही प्रारंभ झालेले नाही. याविषयी वैद्या सौ. स्नेहा भागवत म्हणाल्या, ‘‘संबंधित धारिका कदाचित् अर्थ सचिवांच्या कचेरीत अंतिम प्रक्रियेसाठी असण्याची शक्यता आहे.’’