नाशिक येथील मतदारसूचीत जाणीवपूर्वक दोनदा नावे ठेवणार्‍यांवर गुन्हे नोंद करणार ! – जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची चेतावणी

जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिक – २ ठिकाणी मतदान करण्याच्या उद्देशाने मतदारसूचीत जाणीवपूर्वक बनावट नावे ठेवणार्‍यांच्या विरोधात थेट गुन्हे नोंद करण्यात येतील, अशी चेतावणी येथील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मतदारसूची शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत मतदारसूचींमधील बनावट नावे वा तत्सम गोष्टी यांची पडताळणी करण्यात येणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर मासांत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

अलीकडेच शिवसेनेने ‘शहरातील ३ विधानसभा मतदारसंघांत इतर मतदारसंघातील २ लाख ८७ सहस्रांहून अधिक बनावट नावे हेतूतः घुसवण्यात आली आहेत’, अशी तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याविषयीचे पुरावेही दिले आहेत, असे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले होते. त्यात नाशिक पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक १२ लाख २ सहस्र २४२, नाशिक पूर्वमध्ये ८८ सहस्र ९३२, तर नाशिक दक्षिणमध्ये ७६ सहस्र ३१९ बनावट नावे घुसवण्यात आली आहेत. त्याचाच लाभ घेऊन येथे भाजपचे ३ आमदार आणि ६६ नगरसेवक निवडून आले आहेत, असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.

बनावट नावांविषयी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा केली जात आहे, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.