यातून नक्षलवादी आता मुंबईसारख्या शहरातही कार्यरत झाले आहेत, हे लक्षात येते. नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस कधी यशस्वी होणार ?
मुंबई – येथील गोरेगाव पूर्व वनराई पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात रहाणारे आधुनिक वैद्य डॉ. शाह (वय ७५ वर्षे) यांना पत्र पाठवून ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका बुरख्यातील नक्षलवादी महिलेला अटक केली आहे. १५ सप्टेंबर या दिवशी ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. या शोधमोहिमेत पोलिसांनी ६ पथके सिद्ध केली आहेत, तसेच गुन्हे शाखा ‘युनिट १२’च्या पथकाने आरोपी आणि मुख्य सूत्रधार वगळता आणखी एकाला अटक केली आहे.
घटनेच्या दिवशी आधुनिक वैद्य शाह गोरेगाव पूर्वेतील पांडुरंग वाडीच्या चिकित्सालयात होते. त्या वेळी बुरखा घातलेली एक महिला रिक्शातून आली. तिने चिकित्सालयात काम करणार्या कर्मचार्याला बोलावून आधुनिक वैद्य शाह यांना पत्र देण्यास सांगून ती पसार झाली. आधुनिक वैद्य शाह यांनी चिकित्सालयात बंद करून घरी गेल्यानंतर ते पत्र वाचले, तेव्हा त्यांना धक्का बसला. या पत्रात लिहिले होते, ‘५० लाख रुपये द्या. पैसे न दिल्यास आमचे कामकाज चालू करण्यास सांगितले आहे. आमच्या ‘ऑपरेशन’मध्ये सर्वप्रथम तुमच्या मुलाचा गळा कापला जाईल. त्यानंतर तुमचा (आधुनिक वैद्य शाह यांचा) गळा कापला जाईल. तुमचा गळा कापल्यानंतरच मी ‘ऑपरेशन’ यशस्वी करेन.’ त्यानंतर आधुनिक वैद्य यांनी तातडीने वनराई पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी त्वरित खंडणीचे कलम लावून या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी ‘यू ट्यूब’वर व्हिडिओ पाहून ही योजना आखली होती. हे पत्र एका नक्षलवाद्याने पाठवले आहे, असे सांगितले जात आहे.